Home आरोग्य २० गरजूंच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी ; मंत्री गिरीश महाजन यांचा पुढाकार

२० गरजूंच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी ; मंत्री गिरीश महाजन यांचा पुढाकार


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जळगावात विशेष मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत २० रुग्णांवर मोफत आणि यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, ग्रामीण नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे ‘गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्ष’ यांच्या पुढाकाराने विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात प्रामुख्याने जामनेर तालुका परिसरातील गरजू रुग्णांचा समावेश होता. पहूर, पाळधी आणि लोंढरी या गावांतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.

ग्रामीण भागात डोळ्यांच्या आजारांकडे दुर्लक्ष होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आढळते. यामुळे अनेकांना दृष्टीदोषाचा त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊनच या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात सर्व रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यानंतर आवश्यक त्या रुग्णांवर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली.

या शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयातील अनुभवी नेत्रशल्यचिकित्सकांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडल्या. पथकात डॉ. प्रविण पाटील, डॉ. मयुरी राठोड, डॉ. राधीका दरक, डॉ. मयुरेश डोंगरे, डॉ. सोबीया अन्सारी, डॉ. स्वाती आसोले आणि डॉ. प्रियंका पाटील यांचा समावेश होता. तसेच नेत्रचिकित्सा अधिकारी विलास बाविस्कर, भारती वाणी, आरव आराक आणि गौरव चौधरी यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. सहाय्यक कर्मचारी सुनिता वक्ते, भाग्यश्री ढाकणे, वैष्णवी दांडगे आणि हीरा पालवी यांनी शस्त्रक्रियेदरम्यान तसेच नंतरच्या देखभालीत मोलाचे सहकार्य केले.

या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन ‘गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाचे’ समन्वयक आरोग्यदूत पै. शिवाजी पाटील यांनी केले. रुग्णांची तपासणी, त्यांना सुरक्षितपणे रुग्णालयात आणणे, शस्त्रक्रियेनंतरची सुश्रुषा आणि आवश्यक औषधोपचार याची काटेकोर व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाने विशेष लक्ष ठेवले.

मोफत शस्त्रक्रिया, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि व्यवस्थित नियोजनामुळे सर्व रुग्णांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित होत असून, मंत्री गिरीश महाजन यांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


Protected Content

Play sound