Home क्राईम पाळधी-तरसोद बायपासवर साखळी अपघात : ६ वाहने एकमेकांवर आदळली ; ट्रकचालक गंभीर...

पाळधी-तरसोद बायपासवर साखळी अपघात : ६ वाहने एकमेकांवर आदळली ; ट्रकचालक गंभीर जखमी


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरालगतच्या पाळधी-तरसोद नवीन बायपास महामार्गावर गिरणा नदी पुलाजवळ रात्री उशिरा भीषण साखळी अपघात घडला. काचेच्या बाटल्या घेऊन जाणारा कंटेनर अचानक कलंडल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बाटल्यांचे बॉक्स विखुरले आणि मागून येणारी सहा वाहने एकमेकांवर धडकली. या अपघातात सहा वाहनांचे मोठे नुकसान झाले असून एक ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी-तरसोद बायपासवरील गिरणा नदी पुलाजवळील भोकनी गावाच्या हद्दीत हा अपघात घडला. काचेच्या बाटल्यांचा माल घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर रस्त्यावर कलंडला. कंटेनर कलंडताच त्यातील काचेच्या बाटल्यांचे बॉक्स रस्त्यावर विखुरले गेले. काही क्षणांतच मागून वेगाने येणाऱ्या वाहनांना अचानक अडथळा निर्माण झाल्याने सहा वाहने एकमेकांवर आदळली आणि साखळी अपघात झाला.

या अपघातात एका ट्रकचालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इतर वाहनांतील चालक व प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने कलंडलेला कंटेनर व अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला हलविण्यात आली. रस्त्यावर विखुरलेल्या काचेच्या बाटल्या व बॉक्स हटविण्याचे कामही मोठ्या प्रमाणात करण्यात आले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस व स्थानिक प्रशासनाला मध्यरात्रीपर्यंत प्रयत्न करावे लागले.

दरम्यान, भीषण अपघाताची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. महामार्गावरील वेग, रात्रीची वेळ आणि जड वाहनांची वर्दळ यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.


Protected Content

Play sound