Home राज्य मराठी अभ्यास केंद्राचे २०२४ चे मराठी भाषा पुरस्कार जाहीर

मराठी अभ्यास केंद्राचे २०२४ चे मराठी भाषा पुरस्कार जाहीर


मुंबई-वृत्तसेवा | मराठी भाषा, शिक्षण आणि माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय व सातत्यपूर्ण कार्य करणाऱ्या चार मान्यवरांना ‘मराठी अभ्यास केंद्र’तर्फे २०२४ सालचे मराठी भाषा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. अनंत पांडुरंग देशपांडे, मधुरा राजवंशी, राजेंद्र साठे आणि छाया चंद्रकांत गाडे यांची विविध पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.

या पुरस्कारांचे वितरण रविवार, १ मार्च रोजी सकाळी १० वाजता दादर येथील शिवाजी मंदिरमधील शाहू सभागृहात होणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम व मानपत्र असे आहे.

‘अधिवक्ता शांताराम दातार आणि रविंद्र सुर्वे मराठी भाषा आग्रही पुरस्कार’ ज्येष्ठ विज्ञान प्रसारक अनंत पांडुरंग देशपांडे यांना जाहीर झाला आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील दीर्घ सेवेनंतर त्यांनी मराठीतून विज्ञान प्रसारासाठी अनेक दशके कार्य केले आहे. मराठीतून विज्ञान संकल्पना शिकवल्यास विद्यार्थ्यांना विषय अधिक स्पष्ट होतो, या विश्वासातून त्यांनी विविध व्याख्याने, लेखन, आकाशवाणी-दूरदर्शनवरील कार्यक्रम आणि पुस्तके यांद्वारे व्यापक जनजागृती केली. मराठी विज्ञान परिषदेतील त्यांच्या नेतृत्वाचीही विशेष नोंद घेण्यात आली आहे.

‘जयवंत चुनेकर प्रयोगशील मराठी शिक्षक पुरस्कार’ मधुरा राजवंशी यांना प्रदान करण्यात येणार आहे. फलटण येथील कमला निंबकर बालभवन या प्रयोगशील शाळेत त्या गेली १५ वर्षे अध्यापन करत असून इंग्रजी व लैंगिकता शिक्षण विषयांत त्यांनी नावीन्यपूर्ण प्रयोग केले आहेत. टाटा सामाजिक विज्ञान संस्थामधून प्राथमिक शिक्षण विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ग्रामीण मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी जीवनाभिमुख इंग्रजी शिक्षणाची संकल्पना राबवली. २०२३-२४ मध्ये त्यांना ‘फुलब्राइट डिस्टिंग्विश्ड अवॉर्ड्स इन टीचिंग’ ही आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्तीही मिळाली.

‘दिनू रणदिवे मराठीस्नेही माध्यमकर्मी पुरस्कार’ ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठे यांना जाहीर झाला आहे. गेली ३६ वर्षे त्यांनी वृत्तपत्र, दूरदर्शन आणि डिजिटल माध्यमांत संपादक व विश्लेषक म्हणून काम केले आहे. सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स तसेच ETV मराठी आणि ETV भारत यांसारख्या माध्यमांत त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या. संपादकीय लेखन, राजकीय विश्लेषण आणि नव्या पत्रकारांना मार्गदर्शन हे त्यांच्या कार्याचे विशेष पैलू मानले जातात.

‘अशोक नाना चुरी आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ छाया चंद्रकांत गाडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुण्यातील शिक्षणानंतर त्यांनी विश्रांतवाडी मिल्ट्री स्कूल, अहिल्यादेवी शाळा तसेच मुंबईतील पार्ले टिळक विद्यालयात तब्बल ३७ वर्षे अध्यापन सेवा दिली. सहा वर्षे मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी शाळेचे नेतृत्व केले. उपक्रमशील व विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून त्यांची ओळख असून निवृत्तीनंतरही मराठी बालवाडी, अभ्यासवर्ग आणि पालकशाळा उपक्रमांतून त्या कार्यरत आहेत.

मराठी भाषा, शिक्षण आणि माध्यम क्षेत्रात प्रभावी योगदान देणाऱ्या या चारही मान्यवरांचा सन्मान करून ‘मराठी अभ्यास केंद्र’ त्यांच्या कार्याचा गौरव करणार आहे. या पुरस्कार समारंभाकडे साहित्य, शिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्राचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound