जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील सागर पार्क परिसरात सार्वजनिक शौचालयाचे घाण पाणी थेट मैदानावर सोडले जात असल्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः प्रभाग क्र. १२ मधील रहिवासी आणि सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना अस्वच्छतेचा मोठा सामना करावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
सागर पार्क परिसरातील या सार्वजनिक शौचालयाच्या सांडपाण्याचा योग्य निचरा न झाल्याने ते पाणी थेट मैदानात साचत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून आरोग्याच्या दृष्टीनेही धोका निर्माण झाला आहे. सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना या अस्वच्छ परिस्थितीमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही प्रश्न प्रलंबित राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती.

प्रभाग क्र. १२ मधील रहिवाशांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नगरसेविका गायत्री इंद्रजित राणे यांनी या समस्येची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांकडे तात्काळ कार्यवाहीची मागणी केली. यासोबतच सागर पार्क परिसरातील विविध नागरी समस्यांबाबत त्यांनी महापौर दीपमाला काळे यांना निवेदन सादर केले.
महापौरांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत संबंधित विभागाला त्वरित कारवाईचे आदेश दिले आहेत. सार्वजनिक शौचालयाच्या सांडपाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना करण्यात येणार असून मैदान स्वच्छ व दुर्गंधीमुक्त करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था उभारण्याचा विचारही सुरू असल्याचे समजते.



