Home मनोरंजन ….आता ‘लाडकी विहीण योजना’ ठरतेय चर्चेचा विषय

….आता ‘लाडकी विहीण योजना’ ठरतेय चर्चेचा विषय


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण’ योजनेनंतर आता ‘लाडकी विहीण योजना’ चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र ही कोणतीही शासकीय योजना नसून मराठी रंगभूमीवर येणारे एक नवे कोरे, खुसखुशीत विनोदी नाटक आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्या प्रमुख भूमिकेतून साकारत असलेली ही रंगयोजना रसिकांना हसवण्यासाठी सज्ज झाली आहे.

शासनाच्या योजना जनतेसाठी असतात, पण ही ‘लाडकी विहीण योजना’ थेट प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी ठरणार आहे. दैनंदिन ताणतणाव विसरायला लावणारी, घराघरातल्या नातेसंबंधांवर मिश्किल भाष्य करणारी आणि भरपूर हास्याची मेजवानी देणारी ही कलाकृती असल्याचे कलाकारांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. नावात ‘योजना’ असली तरी यात कुठलीही कागदपत्रे, अटी-शर्ती किंवा अर्ज नाहीत; आहे ती फक्त मनोरंजनाची खात्रीशीर हमी.

अष्टविनायक आणि पंचशील एण्टरटेन्मेंट निर्मित या नाटकाचे लेखन प्रथमेश शिवलकर यांनी केले असून दिग्दर्शन राजेश देशपांडे यांचे आहे. कलाकार आणि तंत्रज्ञ यांची उत्तम भट्टी जुळल्यामुळे ‘लाडकी विहीण योजना’ नक्कीच प्रेक्षकांना खुश करेल, असा विश्वास निर्मिती सावंत यांनी व्यक्त केला. “प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं, तर तोच माझा खरा लाभ,” असे त्या म्हणाल्या. चित्रपटांच्या व्यस्त वेळापत्रकातून पुन्हा रंगभूमीवर परतण्याचा आनंदही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या नाटकात प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी यांच्यासारखी लोकप्रिय आणि गुणी कलाकार मंडळी सहभागी झाली आहेत. प्रसाद ओक यांनी अष्टविनायक संस्थेचे निर्माते दिलीप जाधव यांनी योग्य वेळी दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत हे नाटक प्रेक्षकांना दिलखुलास आनंद देईल, असा विश्वास व्यक्त केला. स्वप्नील जोशी यांनीही वेगळ्या आणि दमदार संहितेच्या शोधात असताना ही कथा मनाला भिडल्याचे सांगितले. “हे नाटक १५० हून अधिक प्रयोगांची मजल मारेल,” असा ठाम विश्वास निर्माते दिलीप जाधव यांनी व्यक्त केला.

नाटकाचे शुभारंभ प्रयोग ५ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथे होणार आहेत. त्यानंतर ६ मार्च रोजी दीनानाथ नाट्यगृह, ७ मार्च रोजी यशवंत नाट्य मंदिर आणि ८ मार्च रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे दुपारच्या सत्रात प्रयोग रंगणार आहेत.

निर्मिती सावंत यांच्यासोबत स्नेहा रायकर, पूर्णिमा अहिरे-केंडे, अधोक्षज कऱ्हाडे, सुनील जाधव, मुकेश जाधव आदी कलाकारांची फळी या नाटकात झळकणार आहे. नेपथ्य प्रदीप मुळ्ये, संगीत अजित परब, प्रकाश योजना सुनील जाधव, गीतलेखन क्षितीज पटवर्धन, गायन राधिका भिडे, वेशभूषा पूर्णिमा ओक आणि रंगभूषा मदन गायकवाड यांनी सांभाळली आहे. सूत्रधार प्रणित बोडके आहेत.


Protected Content

Play sound