पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (रोहयो) प्रलंबित असलेल्या मस्टर आणि विकासकामांच्या प्रश्नावरून पारोळा तालुक्यातील सरपंच संघटनेने पुकारलेले ‘रास्ता रोको’ आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी सरपंच संघटनेला चर्चेसाठी बोलावून सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
पारोळा तालुक्यात ‘रोहयो’ अंतर्गत सिंचन विहिरी, गाय गोठा, शेत पानंद रस्ते आणि ९५/५ रस्ता काँक्रीटीकरण यांसारखी अनेक कामे मंजूर आहेत. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून या कामांचे मस्टर निघत नसल्याने मजुरी आणि साहित्याचे पैसे अडकले होते. यामुळे लाभार्थी आणि ग्रामपंचायतींमध्ये संतापाचे वातावरण होते. या प्रलंबित मागण्यांसाठी २६ फेब्रुवारी रोजी म्हसवे गावाजवळ सरपंच संघटना आणि लाभार्थ्यांनी भव्य ‘रास्ता रोको’ आंदोलनाचे नियोजन केले होते.

सीईओंची मध्यस्थी आणि चर्चा:
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता, सीईओ मीनल करणवाल यांनी सरपंच संघटनेला पत्र पाठवून जिल्हा परिषद कार्यालयात चर्चेसाठी पाचारण केले. “तुम्ही आंदोलनाऐवजी चर्चेला या, आम्ही तुमच्या सर्व कायदेशीर मागण्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करू,” अशी विनंती त्यांनी केली. त्यांच्या या विनंतीला मान देऊन सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली.
या सविस्तर चर्चेदरम्यान, श्रीमती करणवाल यांनी लाभार्थ्यांच्या कामांचे मस्टर तातडीने काढण्याचे आश्वासन दिले. तसेच तालुक्यातील रखडलेली सर्व कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना (BDO) दिले. प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे सरपंच संघटनेने आपले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.
उपस्थित पदाधिकारी:
या चर्चेवेळी सरपंच परिषद राज्य संघटक अनिल पाटील, सरपंच परिषद तालुकाध्यक्ष शीतल अनिल पाटील (बोळे), सरपंच रावसाहेब गिरासे (उंदीरखेडे), सरपंच गणेश पाटील, सरपंच भैय्यासाहेब हिरामण रोकडे यांच्यासह तालुक्यातील विविध गावांचे सरपंच आणि लाभार्थी उपस्थित होते. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाबद्दल सरपंच संघटनेच्या वतीने सीईओ मीनल करणवाल यांचे आभार मानण्यात आले.



