Home Cities जळगाव सभापतीपदासाठी अर्ज प्रक्रियेची सांगता; आता निवडीची उत्सुकता

सभापतीपदासाठी अर्ज प्रक्रियेची सांगता; आता निवडीची उत्सुकता


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव महापालिकेच्या स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सदस्यांची नुकतीच निवड करण्यात आली असून, या समितींच्या सभापती पदासाठी निवड प्रक्रियेला आज बुधवार, २५ फेब्रुवारी रोजी अंतिम टप्पा लागला आहे. दरम्यान, गुरुवार २६ तारखेला दुपारी १ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. शुक्रवार, २७ फेब्रुवारी रोजी विशेष सभेत स्थायी समिती आणि महिला बालकल्याण समिती सभापतींची निवड होणार आहे. या विशेष सभेचे कामकाज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल या पीठासीन अधिकारी म्हणून पाहणार आहेत.

नुकत्याच झालेल्या निवडीनुसार, १६ सदस्यीय स्थायी समिती आणि ९ सदस्यीय महिला व बालकल्याण समितीची रचना पूर्ण झाली आहे. भारतीय जनता पक्षातर्फे दीपक सूर्यवंशी यांनी स्थायी समिती सभापती पदासाठी चार अर्ज नेले आहेत, तर शिवसेना गटनेते विष्णू भंगाळे यांनी महिला बालकल्याण समिती सभापती पदासाठी दोन अर्ज घेत आपली दावेदारी स्पष्ट केली आहे.

राजकीय वर्तुळात सध्या नावांची मोठी चर्चा सुरू आहे. स्थायी समितीच्या अत्यंत महत्त्वाच्या खुर्चीसाठी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी महापौर नितीन लढ्ढा यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. दुसरीकडे, महिला व बालकल्याण समितीसाठी शिवसेनेकडून सिंधू कोल्हे आणि अमृता सोनवणे यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. या दोन्ही समित्या महापालिकेच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये आणि शहराच्या विकासाच्या दृष्टीने कणा मानल्या जातात, त्यामुळे या निवडीचा परिणाम आगामी काळातील कामकाजावर स्पष्टपणे दिसून येणार आहे.

या निवडीमुळे महापालिकेच्या कामकाजाला एक नवी दिशा मिळण्याची शक्यता असून, कोणत्या गटाचे वर्चस्व प्रस्थापित होणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील या चुरशीमुळे शुक्रवारी होणारी विशेष सभा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.


Protected Content

Play sound