मुंबई-वृत्तसेवा | राज्यात महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. २०२५ या वर्षात एकूण ४८ हजार २७८ महिला हरवल्याची नोंद करण्यात आली असून, २०२४ मध्ये ही संख्या ४५ हजार ६६२ इतकी होती. विशेष म्हणजे या प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाणही लक्षणीय आहे.
विधानसभेत लेखी तारांकित प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती देण्यात आली. २०२५ मध्ये १२ हजार ११३ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या, तर २०२४ मध्ये ११ हजार ३१६ अल्पवयीन मुली हरवल्याची नोंद झाली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे हरविलेल्या महिलांपैकी मोठ्या संख्येने महिलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. २०२४ मध्ये हरविलेल्या ३० हजार ८७७ महिला सापडल्या, तर २०२५ मध्ये आतापर्यंत ३६ हजार ५८१ महिला मिळून आल्या आहेत.

राज्यात विशेषतः मुंबई, नवी मुंबई, रायगड, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक असल्याबाबत आमदार मंगेश कुडाळकर, प्रशांत ठाकूर, मनिषा चौधरी यांच्यासह अनेक आमदारांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर देताना ही आकडेवारी सादर केली.
दरम्यान, बेपत्ता आणि शोषित मुलांचा शोध घेण्यासाठी राज्यात ‘ऑपरेशन मुस्कान’ ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. २०१५ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत एकूण १३ ऑपरेशन मुस्कान राबविण्यात आली असून, सध्या १४ वे ऑपरेशन मुस्कान सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
या उत्तरानुसार, मुंबई शहर, नवी मुंबई, रायगड, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या पाच जिल्ह्यांमध्ये २०१४ ते २०२५ या कालावधीत एकूण ४ हजार ९८९ बालके हरविल्याची नोंद झाली होती. त्यापैकी ४ हजार ८१३ बालके शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच १४ ते १८ वयोगटातील हरवलेल्या मुला-मुलींपैकी ९६ टक्क्यांपेक्षा जास्त मुला-मुली सापडल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
महिलांच्या आणि विशेषतः अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत असून, या घटनांवर नियंत्रणासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.



