Home क्राईम मंगला एक्सप्रेसमधील चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश

मंगला एक्सप्रेसमधील चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने जीआरपीच्या समन्वयाने इगतपुरी–कसारा घाट विभागात सक्रिय असलेल्या चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. घाट विभागात वारंवार घडणाऱ्या प्रवाशांच्या सामान चोरीच्या घटनांना आळा घालत आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले असून चोरीचा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

इगतपुरी–कसारा घाट परिसरात चोरीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) यांनी विशेष मोहीम राबवली. कसारा व इगतपुरी येथील आरपीएफ कर्मचारी, गुन्हे प्रतिबंधक व शोध पथक (सीपीडीएस) तसेच Government Railway Police /इगतपुरी यांच्या संयुक्त कार्यदलाची स्थापना करण्यात आली. या पथकाने घाट विभाग आणि लगतच्या डोंगराळ परिसरात संशयितांवर गुप्त पाळत ठेवत सापळा रचला.

दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी पाळत ठेवताना पथकाला संशयास्पद हालचाली आढळल्या. ट्रेन क्रमांक १२६१८ अप Mangala Express (एर्नाकुलम–हजरत निजामुद्दीन) मध्ये एका प्रवाशाच्या सामानाची चोरी करताना दोन जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. रवींद्र नामदेव धोगंडे (वय २६, रा. खडवली) आणि करण भीमराव भालेराव (वय १९, रा. आसनगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पुढील चौकशीत कल्पेश कानू आरे (वय २४) याला बलवंडी येथील त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली.

आरोपींकडून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये मंगळसूत्र, कानातले, नाकातले असे सोन्याचे दागिने तसेच सहा मोबाईल फोनचा समावेश आहे. प्राथमिक तपासात या टोळीने प्रवाशांच्या सामान चोरीचे अंदाजे पाच गुन्हे केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सर्व आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई जीआरपी/इगतपुरी करत आहे.


Protected Content

Play sound