Home टेक्नोलॉजी हैदराबादमध्ये देशातील पहिली पूर्णतः स्वयंचलित पार्किंग सुविधा सुरू

हैदराबादमध्ये देशातील पहिली पूर्णतः स्वयंचलित पार्किंग सुविधा सुरू


हैदराबाद-वृत्तसेवा | शहरांमध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनसंख्येमुळे पार्किंगची समस्या गंभीर बनत चालली असताना, यावर प्रभावी उपाय म्हणून नामपल्ली येथे देशातील पहिली पूर्णतः स्वयंचलित आणि कर्मचारीविरहित (अनअटेंडेड) पार्किंग सुविधा सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही सुविधा जगातील पाचवी तर भारतातील पहिली अशा प्रकारची पार्किंग व्यवस्था ठरली आहे.

या प्रकल्पासाठी तब्बल २०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून, याच वर्षी जानेवारी महिन्यात ही सुविधा नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे.

या अत्याधुनिक पार्किंग इमारतीमध्ये एकूण १० मजले असून, येथे एकाच वेळी २५० कार आणि २०० दुचाकी वाहने पार्क करता येतात. पार्किंग शुल्क देखील परवडणारे ठेवण्यात आले आहे. कारसाठी प्रतितास ३० रुपये, तर दुचाकीसाठी प्रतितास १० रुपये शुल्क आकारले जाते. या पार्किंग व्यवस्थेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा वेग आणि पूर्णतः स्वयंचलित प्रणाली.

वाहन पार्क करण्यासाठी येणाऱ्या चालकाला सर्वप्रथम क्यूआर कोड असलेले स्मार्ट कार्ड दिले जाते. चालकाने आपली गाडी टर्नटेबलवर उभी करून हँडब्रेक लावायचा असतो. त्यानंतर गाडी फिरवणे, उचलणे आणि योग्य स्लॉटमध्ये ठेवणे ही सर्व प्रक्रिया रोबोटिक प्रणाली आणि सेन्सरच्या मदतीने आपोआप होते. यामध्ये कोणत्याही मानवी हस्तक्षेपाची गरज नसते.

विशेष म्हणजे, गाडी पार्क करण्यासाठी एका मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो, तर वाहन परत मिळवण्यासाठी फक्त दोन मिनिटे लागतात.

या पार्किंगमध्ये वापरण्यात आलेले तंत्रज्ञान जर्मनीच्या प्रगत “पॅलिस” प्रणालीवर आधारित आहे. दिल्ली आणि मुंबईतील सध्याच्या स्वयंचलित पार्किंगमध्ये ‘पॅलेट्स’ म्हणजे प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. मात्र, नामपल्ली येथील प्रणाली पॅलेटशिवाय थेट वाहनाच्या चाकांना पकडून ते पार्क करते. ही प्रणाली वाहनाच्या आकारानुसार अचूक जागा निवडते, त्यामुळे जागेचा अधिक कार्यक्षम वापर होतो.

वाढत्या शहरीकरणामुळे पार्किंगचा प्रश्न अधिक गंभीर होत असताना, हैदराबादमधील ही सुविधा देशातील इतर महानगरांसाठी आदर्श ठरणार असल्याचे मानले जात आहे. भविष्यात मुंबई, पुणे, दिल्लीसारख्या शहरांमध्येही अशा स्वयंचलित पार्किंग सुविधा उभारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही सुविधा केवळ पार्किंगची समस्या सोडवणार नाही, तर स्मार्ट सिटीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.


Protected Content

Play sound