Home Cities जळगाव लेवा पाटीदार समाजाचा शाही सोहळा; १९ जोडपी विवाहबध्द !

लेवा पाटीदार समाजाचा शाही सोहळा; १९ जोडपी विवाहबध्द !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सामाजिक ऐक्य आणि साधेपणाचा संदेश देत, ‘अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ’ आणि ‘बहीणाई ब्रिगेड’ यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी, २२ फेब्रुवारी रोजी जळगाव शहरात लेवा पाटीदार समाजाचा भव्य सामूहिक विवाह सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या मंगलमयी सोहळ्यात एकूण १९ जोडपी विवाहबंधनात अडकली असून, त्यांना आशिर्वाद देण्यासाठी राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी जमली होती.

पारंपारिक मिरवणुकीने वेधले लक्ष :
सोहळ्याची सुरुवात रविवारी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जुन्या जळगावातील ऐतिहासिक विठ्ठल मंदिर येथून झाली. या विवाह सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे नवरदेवांची काढण्यात आलेली भव्य मिरवणूक. सर्व नवरदेव सजवलेल्या बैलगाड्यांवर स्वार झाले होते, जे पाहून जुन्या परंपरेची आठवण ताजी झाली. या मिरवणुकीत समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिलांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून मंगलवाद्य, संभळ आणि टाळ-मृदुंगाच्या तालावर ठेका धरला. अनेक महिलांनी भररस्त्यात फुगड्या खेळून आनंदाचे प्रदर्शन केले. ही मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून काढत काशीबाई कोल्हे शाळेजवळील ‘मीराई लॉन’ येथे पोहोचली.

मान्यवरांची उपस्थिती आणि सत्कार :
या भव्य सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी विशेष उपस्थिती लावून नवदाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासोबत महापौर दीपमाला काळे, आमदार राजूमामा भोळे, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका केतकीताई पाटील, युवा नेते धनंजय चौधरी आणि हभप भरत महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लेवा एज्युकेशन युनियनचे उल्हास चौधरी, कौशल पाटील, दीपक चौधरी, स्वप्निल चौधरी यांच्यासह नगरसेविका सिंधूताई कोल्हे, नगरसेवक विष्णू भंगाळे, माजी महापौर जयश्री महाजन, माजी महापौर सीमाताई भोळे आणि सोहम खडके यांनी विशेष परिश्रम घेतले.

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे योगदान :
बहिणाबाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा आशाताई कोल्हे, उपप्रदेशाध्यक्षा वर्षा बोरोले, जिल्हाध्यक्षा सुनीता येवले आणि महानगराध्यक्षा वैशाली झोपे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडीने चोख नियोजन केले होते. तसेच अखिल भारतीय लेवा पाटीदार युवा महासंघाचे अध्यक्ष प्रकाशराव पाटील, उपाध्यक्ष राजेश चौधरी, प्रदेशाध्यक्ष प्रदीप भोळे आणि जिल्हाध्यक्ष मधुकर भंगाळे यांनी या उपक्रमाद्वारे समाजात एकतेचा संदेश दिला.

सामाजिक संदेश :
अवाढव्य खर्च टाळून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले. या सोहळ्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांवरील लग्नाचा आर्थिक भार हलका होण्यास मदत झाली आहे. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व नवविवाहित जोडप्यांना संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. या सोहळ्याला जळगाव जिल्हाभरातून लेवा पाटीदार समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे मीराई लॉनचा परिसर जनसागराने ओसंडून वाहत होता.


Protected Content

Play sound