अहमदाबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । टी20 विश्वचषकातील सुपर 8 फेरीत आज भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन अपराजित संघ आमनेसामने येत असून क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 2024 च्या अंतिम सामन्यात भारताने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर पुन्हा एकदा हे दोन्ही संघ मोठ्या लढतीत भिडत आहेत.
ग्रुप अ मधून अव्वल स्थान पटकावणारा भारत आणि ग्रुप ड मधून प्रथम क्रमांकाने पुढे आलेला दक्षिण आफ्रिका संघ अद्याप या स्पर्धेत पराभूत झालेला नाही. त्यामुळे सुपर 8 मधील हा सामना केवळ प्रतिष्ठेचा नसून गुणतालिकेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. 2024 च्या टी20 विश्वचषक फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेवर मात करत जे वर्चस्व सिद्ध केले होते, त्याची पुनरावृत्ती करण्याचा निर्धार संघाने व्यक्त केला आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सुपर 8 सामना आज, 22 फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वर पाहता येणार असून लाईव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टार अॅपवर उपलब्ध असेल.
तिलकच्या जागी संजू सॅमसन याला संधी देण्याच्या चर्चाही रंगल्या होत्या, मात्र सूर्यकुमार यांनी त्या शक्यतेला फेटाळले. पॉवरप्लेमध्ये संघ 40-50 धावा करत असल्याने संघ व्यवस्थापन समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. सलामीवीर अभिषेक शर्मा अद्याप धावफलक उघडू शकला नसला तरी त्याच्यावर विश्वास कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अभिषेक एकदा फॉर्ममध्ये आला, तर प्रतिस्पर्ध्यांसाठी तो धोकादायक ठरू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
संभाव्य भारतीय संघात अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांचा समावेश असू शकतो. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉक, एडेन मार्कराम (कर्णधार), रायन रिकेल्टन, देवाल्ड ब्रुविस, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी मैदानात उतरू शकतात.
नरेंद्र मोदी स्टेडियम येथील खेळपट्टी साधारणतः फलंदाजीस अनुकूल मानली जाते. या विश्वचषकात येथे खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांपैकी सहा डावांमध्ये फक्त एकदाच एखाद्या संघाला 170 पेक्षा कमी धावा करता आल्या आहेत. दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तानचा सुपर ओव्हरपर्यंत गेलेला सामना याच मैदानावर झाला होता. त्यामुळे आजच्या सामन्यातही चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.



