जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खान्देश आणि विदर्भातील नागरिकांसाठी आरोग्य जागर शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत नेत्र व शारीरिक तपासणी शिबिरातून लोकांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यास महत्त्व दिले जात आहे.
गोदावरी फॉउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय तज्ज्ञांची टीम २२ ते २८ फेब्रुवारीपर्यंत खान्देशातील विविध गावांना भेट देऊन नागरिकांची नेत्र आणि शारीरिक तपासणी करणार आहे. शिबिरादरम्यान ज्या रूग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल, त्यांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रांच्या पूर्तीनंतर ताबडतोब शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमसोबत आरोग्य मित्र आणि गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. याचाच भाग म्हणून नेत्र विभागाने ६६ मोतिबिंद रूग्णांची तपासणी केली असून शस्त्रक्रियांसाठी योग्य रूग्णांची निवड करण्यात आली आहे. शिबिरातून केवळ नेत्रच नाही तर शारीरिक आरोग्याचीही तपासणी करण्यात येत असून, नागरिकांना योग्य सल्ला व उपचार मिळण्यासही मदत होत आहे.
या शिबिरामुळे ग्रामीण आणि दूरदराज भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळत असल्याने स्थानिक समाजात समाधान निर्माण झाले आहे. उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून, अशा उपक्रमांमुळे आरोग्याबाबत जनजागृती वाढेल असा विश्वास व्यक्त केला आहे.



