Home करियर डॉ. तायडे दाम्पत्याचा जागतिक डंका; अमेरिकेकडून प्रतिष्ठेचा “अब्राहम लिंकन ग्लोबल एक्सलंट पुरस्कार...

डॉ. तायडे दाम्पत्याचा जागतिक डंका; अमेरिकेकडून प्रतिष्ठेचा “अब्राहम लिंकन ग्लोबल एक्सलंट पुरस्कार २०२६” प्रदान


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आपल्या दैदिप्यमान आणि सातत्यपूर्ण कामगिरीमुळे देश-विदेशात लौकिक मिळविणाऱ्या डॉ. डिगंबर तायडे व सौ. शकुंतला तायडे या दाम्पत्याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा उंचावला आहे. अमेरिकेकडून प्रतिष्ठेचा “अब्राहम लिंकन ग्लोबल एक्सलंट पुरस्कार २०२६” प्रदान करण्यात येताच त्यांच्या नावाची नोंद अमेरिकन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली असून तायडे दाम्पत्याच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

डॉ. डिगंबर तायडे यांनी आतापर्यंत तब्बल ११७ हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावावर कोरले आहेत. विविध क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे भारतासह परदेशातही त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. “अब्राहम लिंकन ग्लोबल एक्सलंट पुरस्कार २०२६” हा सन्मान त्यांना विशेषत: “बेस्ट क्रिएटिव्ह डायरेक्टर फॉर शॉर्ट म्युझिकल फिल्म” या श्रेणीत मिळाला असून संबंधित लघुपटाची अधिकृत नोंद अमेरिकन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. ही बाब त्यांच्या कारकिर्दीतील ऐतिहासिक टप्पा मानली जात आहे.

या प्रवासात त्यांना खंबीर साथ लाभली ती त्यांच्या अर्धांगिनी सौ. शकुंतला तायडे यांची. यशाच्या प्रत्येक पायरीवर त्यांनी खांद्याला खांदा लावून साथ दिल्यामुळे हे दाम्पत्य गाडीची दोन चाके ठरले आहे. सातत्य, परिश्रम आणि ध्येयवेड या बळावर त्यांनी जागतिक स्तरावर आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. आजपर्यंत ११७ पुरस्कारांची नोंद करणारे हे दाम्पत्य भारतातच नव्हे तर जगाच्या पाठीवर दुर्मिळ मानले जात आहे.

दरम्यान, युनायटेड स्टेट्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा विशेष पुरस्कारही डॉ. तायडे यांना प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या दिग्दर्शन व निर्मितीतील लघुपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात “बेस्ट क्रिएटिव्ह डायरेक्टर”, “बेस्ट म्युझिकल व्हिडिओ फिल्म”, “बेस्ट सिंगर” आणि “बेस्ट शॉर्ट फिल्म” असे एकूण चार पुरस्कार मिळाले. तसेच मुंबईतील बांद्रा-कुर्ला संकुलाच्या निर्मितीत दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांच्या कार्याची नोंद यूएसए बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.

मुंबई येथे सहारा स्टार हॉटेलमध्ये आयोजित सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री मोनिका बेदी व दिग्दर्शक अखिलेश (डीपिटा चॅरिटेबल ट्रस्ट) यांच्या हस्ते “दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हिजन ॲवार्ड २०२६” देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे “गव्हर्नर सुप्रीम लीगन्सी पुरस्कार २०२६” तसेच मेयर हॉल, मुंबई येथे इंटरनॅशनल ह्युमन राईट ॲम्बेसेडर्स असोसिएशनतर्फे “भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२६” प्रदान करण्यात आला. विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर मिळालेल्या या सन्मानामुळे तायडे दाम्पत्याची कीर्ती अधिकच उजळली आहे.

याशिवाय ग्लोबल इन्फ्लुएंसर लीडर अवॉर्ड २०२५, ग्रेट इंडियन पार्लमेंट अवॉर्ड, ग्लोबल इंडिया सिने अवॉर्ड, छत्रपती शिवाजी महाराज सोशल अवॉर्ड, खिलाडीयोंके खिलाडी अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. नॅशनल हेराल्ड यूएसए या मासिकाच्या मुखपृष्ठावर स्थान देत त्यांना जीवनगौरव पुरस्कारानेही गौरविण्यात आले. “हे आभाळ वाटे ठेंगणे” ही अभिलाषा मनाशी बाळगून कार्यरत असलेले हे दाम्पत्य दिवसेंदिवस नव्या विक्रमांची नोंद करत असून त्यांच्या कार्याबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound