जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुने जळगाव परिसरात पोलीस असल्याचे भासवून तीन अज्ञात भामट्यांनी एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेला गंडवत तिचे तब्बल १ लाख ५६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना १० फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी १९ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील रामपेठ येथे कमलबाई एकनाथ सोनार (वय ६५) या वृध्द महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १० फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास जुने जळगाव भागातील भाग्यलक्ष्मी टेंट हाऊस जवळच्या चौकातून जात होत्या. यावेळी ३० ते ३५ वयोगटातील तीन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आले. आपण पोलीस असल्याचे सांगून या भामट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतवले आणि विश्वास संपादन केला. तिघा भामट्यांनी हातचलाखी करून कमलबाई यांच्या जवळील सोन्याची चैन आणि सोन्याच्या बांगड्या असा एकूण १ लाख ५६ हजारांचा ऐवज काढून घेतला आणि तिथून पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कमलबाई यांनी पोलीस स्टेशन गाठले. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अनोळखी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार गणेश नायकर हे करीत आहे.




