Home क्राईम वनीकरण क्षेत्राला भीषण आग; पाच वर्षांची झाडे जळून नुकसान

वनीकरण क्षेत्राला भीषण आग; पाच वर्षांची झाडे जळून नुकसान


धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरानजीक असलेल्या शासकीय वनीकरण क्षेत्राला गुरूवारी १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. नवीन विश्रामगृहाच्या अगदी पाठीमागच्या बाजूस असलेल्या या वनक्षेत्रात आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे सुमारे दीड ते दोन हेक्टर परिसरातील वनसंपदा पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन विश्रामगृहाच्या मागील बाजूस असलेल्या वनीकरण क्षेत्रात अचानक धूर निघू लागला. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही वेळातच आगीने भस्मासुराचे रूप धारण केले आणि संपूर्ण परिसरात वणवा पसरला. या आगीच्या भक्ष्यस्थानी वनीकरण विभागाची सुमारे पाच वर्षांची जुनी झाडे आली आहेत. अत्यंत कष्टाने जोपासलेली ही झाडे पूर्णपणे जळाल्याने पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले असून निसर्गप्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने मदतीला धावून आले. वनीकरण क्षेत्राच्या शेजारी शेती असलेल्या शेतकऱ्यांनी आपापल्या परीने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. शेतकऱ्यांनी दाखविलेल्या या तत्परतेमुळे आग अधिक पसरण्यापासून रोखता आली, अन्यथा शेजारील शेतातील उभ्या पिकांनाही मोठा धोका निर्माण झाला असता.

प्राथमिक अंदाजानुसार, दीड ते दोन हेक्टर क्षेत्रातील गवत आणि पाच वर्षांची लहान-मोठी झाडे या आगीत भस्मसात झाली आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वन विभागाने या घटनेचा पंचनामा करून भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.


Protected Content

Play sound