Home प्रशासन तहसील बोगस केळी विमा प्रकरणांची जोरदार चर्चा ; शेतकरी संतप्त 

बोगस केळी विमा प्रकरणांची जोरदार चर्चा ; शेतकरी संतप्त 


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून बोगस केळी विमा प्रकरणांची जोरदार चर्चा सुरू असून, यामुळे शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रत्यक्ष शेती नसतानाही काही व्यक्तींच्या नावावर केळी विमा काढण्यात आल्याचे धक्कादायक आरोप पुढे येत आहेत. साकळी, अट्रावलसह तालुक्यातील विविध भागांमध्ये या प्रकाराने उग्र रूप धारण केल्याचे बोलले जात आहे.

स्थानिक स्तरावर काही दलाल, संबंधित अधिकारी आणि विमा कंपन्यांतील काही घटक यांच्या संगनमतातून हा गैरप्रकार राबवला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कागदोपत्री शेती दाखवून खोटे पंचनामे तयार करणे, बनावट कागदपत्रे सादर करणे आणि त्याच्या आधारे विमा मंजूर करून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप होत आहे. या माध्यमातून लाखो रुपयांचा अपहार झाल्याची चर्चा रंगत आहे.

शेतकरी बांधवांचे म्हणणे आहे की, प्रत्यक्षात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या खरी पात्र शेतकऱ्यांना मदत मिळण्यात अडचणी येतात, तर बोगस लाभार्थी मात्र सहजपणे लाभ उचलतात. त्यामुळे शासनाच्या विमा योजना बदनाम होत असून प्रामाणिक शेतकऱ्यांचा विश्वास डळमळीत होत आहे. “या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण आणि कोणाच्या आशीर्वादाने हा खेळ सुरू आहे, याची सखोल चौकशी व्हावी,” अशी मागणी शेतकरी करत आहेत.

नागरिकांनी स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून मागील काही वर्षांतील सर्व केळी विमा प्रकरणांची फेरतपासणी करण्याची मागणी केली आहे. जमीन नोंदी, सातबारा उतारे, प्रत्यक्ष पाहणी अहवाल आणि विमा मंजुरी प्रक्रिया यांची बारकाईने छाननी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जोर धरत आहे. दोषी अधिकारी, दलाल आणि संबंधित घटकांवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही काही शेतकऱ्यांनी दिला आहे.

दरम्यान, प्रशासन या गंभीर आरोपांकडे कोणत्या दृष्टीने पाहते आणि चौकशीची दिशा खरोखरच ‘मुख्य सूत्रधारां’पर्यंत पोहोचते का, याकडे साकळी, अट्रावल व संपूर्ण यावल तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची पारदर्शक चौकशी होऊन दोषींना शिक्षा झाल्यासच शेतकऱ्यांचा विश्वास परत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound