Home क्राईम मुक्ताईनगरात परीक्षा केंद्रावर टोळक्याचा राडा ; शाळेचे नुकसान करत कॉपी देण्याचा प्रयत्न

मुक्ताईनगरात परीक्षा केंद्रावर टोळक्याचा राडा ; शाळेचे नुकसान करत कॉपी देण्याचा प्रयत्न

0
185

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथील जे. ई. स्कूल परीक्षा केंद्रावर बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या पेपरदरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १० ते १५ जणांच्या टोळक्याने शाळेच्या इमारतीचे लोखंडी गेट आणि खिडक्यांच्या जाळ्या तोडून अनधिकृतपणे प्रवेश केला आणि विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणीमुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संशयित आरोपी अफसर खानसह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी आहे घटना :
सोमवार, १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा भौतिकशास्त्र विषयाचा पेपर सुरू होता. जे. ई. स्कूल केंद्रावर एकूण १०९९ विद्यार्थी परीक्षा देत होते. दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास अफसर खान नावाच्या इसमाने अनधिकृतपणे मुख्य गेटमधून प्रवेश केला. तो सुमारे तासभर शाळेच्या प्रांगणात फोनवर बोलत थांबला होता, असे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे.

लोखंडी गेट आणि खिडक्यांचे नुकसान :
दुपारी १ वाजेच्या सुमारास १० ते १५ अज्ञात इसमांनी शाळेच्या मुख्य इमारतीच्या मागील बाजूचे लोखंडी गेट जबरदस्तीने तोडले. इतकेच नव्हे तर इमारतीच्या १० खिडक्यांच्या जाळ्या तोडून त्यांनी परीक्षेच्या ब्लॅाकमध्ये कॉपी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी या टोळक्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, सर्व आरोपी तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले.

शासकीय कामात अडथळा आणि मालमत्तेचे नुकसान :
मुख्याध्यापक प्रकाश बाउस्कर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, या टोळक्याने केवळ अनधिकृत प्रवेश केला नाही, तर शाळेच्या मालमत्तेचे नुकसान करून परीक्षा प्रक्रियेत अडथळा निर्माण केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे इतर आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परीक्षा केंद्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


Protected Content

Play sound