जळगाव/बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भात राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, प्रभाग रचनेचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. या निर्णयामुळे आता ग्रामीण भागात निवडणुकीचे वारे वाहू लागले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.
२० फेब्रुवारीपासून कामाला सुरुवात :
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, २० फेब्रुवारी २०२६ पासून प्रभाग रचनेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी आणि ग्रामसेवक गावाच्या नकाशांना अंतिम स्वरूप देतील. त्यानंतर, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या कामाची संक्षिप्त तपासणी केली जाईल. २३ मार्चपर्यंत राज्य निवडणूक आयोग या प्रस्तावाला रीतसर मान्यता देणार आहे.

असे आहे वेळापत्रक :
ग्रामविकास विभागाच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार:
७ एप्रिल २०२६: ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल.
१३ एप्रिल २०२६: नागरिकांना प्रभाग रचनेवर आपल्या हरकती आणि सूचना नोंदवता येतील.
२१ एप्रिल २०२६: प्राप्त झालेल्या हरकतींवर उपविभागीय अधिकारी सुनावणी घेतील.
२८ एप्रिल २०२६: जिल्हाधिकारी सर्व प्रस्तावांची पडताळणी करून अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करतील.
लवकरच निवडणुकांचा धुरळा :
प्रभाग रचनेचे हे काम पूर्ण होताच राज्यामध्ये ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेमुळे आता गावागावात पॅनेल बांधणी आणि उमेदवारांच्या निवडीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. महसूल आणि ग्रामविकास यंत्रणा या कामासाठी सज्ज झाली असून, प्रशासकीय पातळीवर तयारीला वेग आला आहे.



