Home क्राईम मोठी बातमी : वीस लाखांच्या खंडणीसाठी अपहरण ; मामा-भाच्याची सुटका, तिघे जेरबंद

मोठी बातमी : वीस लाखांच्या खंडणीसाठी अपहरण ; मामा-भाच्याची सुटका, तिघे जेरबंद


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका मोबाईल साहित्य विक्रेत्याचे आणि त्यांच्या भाच्याचे २० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिपेठ पोलिसांनी अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अवघ्या काही तासांत या गुन्ह्याचा छडा लावत दोन आरोपींसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कृष्णकुमार डुंगराराम चौधरी (वय ३२) हे मोबाईल साहित्याचे विक्रेते आहेत. १५ फेब्रुवारी रोजी आरोपी यश जितेंद्र माकोडे (वय २२, रा. जळगाव) याने फिर्यादीचा भाचा गणपतलाल माली (वय १९) याला ममुराबाद रोडवरील एका घरात डांबून ठेवले. त्यानंतर, आरोपीने फिर्यादी कृष्णकुमार यांना स्वतःच्या मोटारसायकलवर बसवून अकोला येथे नेले. तिथे त्याचा साथीदार युवराज गणेश पवार (वय २४) याच्या मदतीने फिर्यादीला डांबून ठेवत, जिवे मारण्याची धमकी देऊन २० लाख रुपयांची खंडणी मागितली.

ऑनलाईन खंडणी आणि धमकी :
आरोपींनी फिर्यादीकडून सुरुवातीला १५ हजार रुपये ‘गुगल पे’द्वारे स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. त्यानंतर आरोपींनी भाच्याला अकोल्यात डांबून ठेवले आणि कृष्णकुमार यांना २० लाख रुपये घेऊन येण्यासाठी जळगावला पाठवून दिले. जळगावला परतताच फिर्यादीने तात्काळ शनिपेठ पोलीस स्टेशन गाठून आपबिती सांगितली.

पोलिसांची गतीमान कारवाई :
घटनेचे गांभीर्य ओळखून शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. अकोला एलसीबीचे प्रभारी पो.नि. शंकर शेळके यांच्याशी संपर्क साधून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचे लोकेशन शोधले. जळगाव आणि अकोला पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ताथोड नगर (अकोला) येथील घरातून गणपतलाल याची सुखरूप सुटका केली.

या कारवाईत पोलिसांनी यश माकोडे, युवराज पवार आणि एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी मोहीम राबवण्यात आली. संशयित आरोपींना पुढील कारवाईसाठी शनीपेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


Previous articleन्यायालय आवारातून दुचाकी लांबवणारा सराईत चोरटा जेरबंद !
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

Protected Content

Play sound