Home क्राईम नागपुरात बुलेट स्टंटचा दुर्दैवी शेवट ; दोन 19 वर्षीय तरुणांचा मृत्यू

नागपुरात बुलेट स्टंटचा दुर्दैवी शेवट ; दोन 19 वर्षीय तरुणांचा मृत्यू


नागपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । रिल्स आणि स्टंटबाजीच्या नादात बेफाम वेगाने बाईक चालवण्याची तरुणाईतील वाढती प्रवृत्ती पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. नागपूरमध्ये बुलेटवरून स्टंट करत मुलीला कट मारण्याच्या प्रयत्नात झालेल्या भीषण अपघातात दोन १९ वर्षीय तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात असून बेफाम वाहनचालकांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.

शहरातील काचिपुरा परिसरात उशिरा रात्री हा अपघात घडला. वर्धा मार्गावरील जनता चौक ते बजाजनगर चौकदरम्यान बुलेटवरून वेगात फेऱ्या मारत सिग्नल जंप करत असल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णूजी की रसोई समोर एका महिला दुचाकीस्वाराला कट मारत पुढे जाण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटला. भरधाव वेगातील बाईक थेट रस्त्याकडील पिलरवर जोरात आदळली.

या भीषण धडकेत १९ वर्षीय युग विशाल चनकापूरे आणि १९ वर्षीय रुद्र शशिकांत सोमकुंवर या दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही स्थानिक स्तरावर कबड्डी खेळाडू म्हणून ओळखले जात होते. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले.

घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचा पुढील तपास बजाज नगर पोलीस ठाणे करत असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक तपासात बेफाम वेग आणि स्टंटबाजी हे अपघातामागील प्रमुख कारण असल्याचे समोर येत आहे.

अलिकडच्या काळात सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी तरुणांकडून धोकादायक स्टंट केले जात असल्याच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि पोलिसांकडून कडक अंमलबजावणीची गरज व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून शहरात शोककळा पसरली आहे.


Protected Content

Play sound