रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरासाठी अभिमानाची बातमी समोर आली असून रावेर पोदार लर्न स्कूलला नवी दिल्ली येथील Central Board of Secondary Education (CBSE) ची पहिल्याच प्रयत्नात संलग्नता मिळाली आहे. या मान्यतेमुळे रावेर व परिसरातील विद्यार्थ्यांना आता स्थानिक पातळीवरच राष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण प्रणालीचा लाभ मिळणार आहे.
अंजदा रस्त्यावर स्थित असलेल्या पोदार लर्न स्कूलने अवघ्या ६० विद्यार्थ्यांपासून सुरुवात करत आज ६५० विद्यार्थ्यांपर्यंतचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे. अलीकडेच दिल्ली येथील सीबीएसई बोर्डाच्या निरीक्षण पथकाने शाळेला भेट देऊन सर्व सुविधांची पाहणी केली होती. सुसज्ज वाचनालय, अत्याधुनिक प्रयोगशाळा, डिजिटल शिक्षण पद्धती, सुरक्षित व स्वच्छ परिसर तसेच शैक्षणिक व्यवस्थापनाच्या उच्च दर्जामुळे शाळेला सीबीएसईची अधिकृत संलग्नता प्रदान करण्यात आली.

या संलग्नतेमुळे रावेर परिसरातील पालक व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी अनेक विद्यार्थी दर्जेदार शिक्षणासाठी शेजारच्या बुऱ्हाणपूर येथे जात होते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च आणि प्रवासाचा त्रास सहन करावा लागत होता. आता रावेरमध्येच सीबीएसई अभ्यासक्रम उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहेत.
रावेर पोदार स्कूलला CBSE संलग्नता क्रमांक 1131580 प्रदान करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, पहिल्याच प्रयत्नात मिळालेली ही मान्यता संस्थेसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. पालकांचा सातत्यपूर्ण विश्वास आणि सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढेही उत्कृष्टतेसाठी कटिबद्ध राहून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या यशामध्ये शाळेच्या सचिव सुचिता पाटील आणि प्राचार्य डॉ. जतीन हिंदुजा यांचे विशेष योगदान असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. शैक्षणिक गुणवत्ता, शिस्तबद्ध प्रशासन आणि आधुनिक सुविधा यांचा संगम साधत पोदार लर्न स्कूलने रावेरच्या शैक्षणिक क्षेत्रात नवे पर्व सुरू केले आहे.



