नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। महाराष्ट्राची लेक आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची आघाडीची फलंदाज स्मृती मानधना हिने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा उंचावला आहे. 2025 सालच्या ‘बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर’ या मानाच्या पुरस्कारासाठी तिची निवड करण्यात आली असून दिल्लीत पार पडलेल्या भव्य सोहळ्यात तिच्या नावाची घोषणा करण्यात आली. भारतीय महिला संघाच्या ऐतिहासिक विश्वचषक विजयात मोलाची भूमिका बजावल्यामुळेच तिला हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळाला आहे.
2025 साली भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकत इतिहास रचला. या विजयात स्मृती मानधनाने सलामीवीर म्हणून सातत्यपूर्ण आणि प्रभावी फलंदाजी करत संघाला भक्कम सुरुवात करून दिली. महत्त्वाच्या सामन्यांमध्ये तिच्या धडाकेबाज खेळीमुळे भारताला निर्णायक आघाडी मिळाली. तिच्या कामगिरीची दखल घेत बीबीसीकडून तिला ‘इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर’ म्हणून गौरविण्यात आले.

सध्या स्मृती मानधना भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून भारतीय संघ तेथे एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 मालिका खेळत आहे. परदेशात असल्यामुळे ती पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहू शकली नाही. मात्र तिने ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून बीबीसीचे आभार मानत 2025 हे वर्ष भारतीय महिला क्रिकेटसाठी विशेष ठरल्याचे सांगितले. विश्वचषक विजयात योगदान देता आले, याचा अभिमान असल्याची भावना तिने व्यक्त केली.
या पुरस्कार विजेत्यांची निवड करणाऱ्या परीक्षक मंडळात दिग्गज क्रीडापटूंचा समावेश होता. टेनिसपटू लिएंडर पेस, पॅरा-अॅथलीट दीपा मलिक आणि लांबउडीपटू अंजू बॉबी जॉर्ज यांनी निवड प्रक्रियेत सहभाग घेतला होता. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला क्रीडाविश्वातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
२९ वर्षीय स्मृती मानधना ही सध्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा कणा मानली जाते. सांगलीसारख्या छोट्या शहरातून क्रिकेटची सुरुवात करत तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवले आहे. महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंमध्ये ती दुसऱ्या स्थानावर असून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2025 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या ५० चेंडूत शतक झळकावत तिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला होता. अशी कामगिरी करणारी ती दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
दरम्यान, बीबीसीच्या इतर पुरस्कारांमध्ये बुद्धिबळ ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिला ‘इमर्जिंग प्लेयर ऑफ द ईयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर पॅरा-अॅथलीट प्रीती पाल हिला ‘पॅरा-स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर’ किताब मिळाला. नेमबाज अंजली भागवत यांना ‘लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड’ देऊन गौरवण्यात आले.



