Home क्राईम सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ; संतप्त नागरिकांचे महामार्गावर तासभर ठिय्या आंदोलन

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ; संतप्त नागरिकांचे महामार्गावर तासभर ठिय्या आंदोलन


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कालंका माता चौक परिसरात सलग दुसऱ्या दिवशी अपघाताची घटना घडल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला असून सोमवारी सायंकाळी महामार्गावर तासभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. भरधाव ट्रकने कारला कट मारल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीत वाहतूक काही काळ विस्कळीत झाली आणि स्थानिकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी भरधाव वाळूच्या डंपरने एका पादचाऱ्याला चिरडल्याची गंभीर घटना घडली होती. त्या घटनेनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सोमवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा अपघात घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक येथून इंदौर येथे वायरचे बंडल घेऊन (केए २८, एए ७५३५) क्रमांकाचा ट्रक अजिंठा चौफुलीकडून कालंका माता चौफुलीकडे जात होता. त्याचवेळी (एमएच ०५, बीजे २५०४) क्रमांकाची कार ट्रकच्या शेजारून जात असताना कालंका माता मंदिराजवळ ट्रकने कारला कट मारल्याची घटना घडली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे कारचालकाने तत्काळ वाहन थांबवत महामार्गाच्या मधोमध ट्रक अडवला. परिणामी, दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

अपघाताची माहिती परिसरात पसरताच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. दोन दिवसांत दुसऱ्यांदा अपघात झाल्याने संतप्त नागरिकांनी कालंका माता चौफुली परिसरात रस्तारोको करत ठिय्या आंदोलन सुरू केले. सुमारे तासभर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. आंदोलकांनी संबंधित आयुक्तांविरोधात घोषणाबाजी करत तातडीने वेगमर्यादा, सिग्नल व्यवस्था आणि पोलिस बंदोबस्त वाढवण्याची मागणी केली.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड आणि शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्यासह पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले तसेच आंदोलकांची समजूत काढून मार्ग मोकळा केला.

सलग अपघातांमुळे कालंका माता चौक परिसर धोकादायक ठरत असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


Protected Content

Play sound