अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा आता सीसीटीव्हीच्या निगराणीत आली असून ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून शाळेला चार सीसीटीव्ही कॅमेरे, एलसीडी मॉनिटर व मोठा प्रिंटर भेट देण्यात आला आहे. शाळेच्या सुरक्षिततेसह शैक्षणिक कामकाज अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असून परिसरात याचे स्वागत करण्यात येत आहे.
ता. अमळनेर येथील कळमसरे जि.प. प्राथमिक मुलांची शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा व प्रिंटर अर्पण सोहळा उत्साहात पार पडला. ग्रामपंचायत कळमसरेच्या वतीने शाळेसाठी चार अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे, एलसीडी मॉनिटर तसेच मोठा प्रिंटर प्रदान करण्यात आला. या सुविधेमुळे शाळा परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य होणार असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला बळकटी मिळणार आहे.

कार्यक्रमाला सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्रसिंग राजपूत, ग्रामपंचायत सदस्य दिनकर चव्हाण, सदस्या मीनाबाई कुंभार, विस्तार अधिकारी कठाडे साहेब, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर पाटील, ग्रामपंचायत अधिकारी वाघ भाऊसाहेब उपस्थित होते. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास भिल, उपाध्यक्ष वसंत महाजन, कन्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप महाजन, पत्रकार बाबूलाल पाटील व गजानन पाटील, समिती सदस्य सौ. शितल भिल, सौ. पौर्णिमा वल्लर, सौ. सोनाली पारधी यांचीही उपस्थिती होती.
मुख्याध्यापक किशोर सिसोदे यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या गरजांचा आढावा घेत ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षण विस्तार अधिकारी रावसाहेब मांगो पाटील व केंद्रप्रमुख अशोक सोनवणे यांनीही ग्रामपंचायतीचे आभार मानत शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा सहकार्याची गरज अधोरेखित केली. यावेळी कन्या शाळेचे केशव बडगुजर, जयश्री बडगुजर तसेच पालक सुनील पाटील, शांताराम पवार, कृष्णा भील उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भरत जाधव यांनी केले. स्वयंपाकी सौ. अर्चना कुंभार व गेंद्रसिंग पाटील यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.



