Home क्राईम वाळू उचलण्यावरून वाद ; महिलेला मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

वाळू उचलण्यावरून वाद ; महिलेला मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल


भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बांधकामाची वाळू उचलण्याच्या शुल्लक कारणावरून महिलेला मारहाण केल्याची घटना भडगाव तालुक्यातील महिदळे येथे घडली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कल्पना विजय पाटील (वय ४२, रा. महिदळे, ता. भडगाव) या आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास, त्यांच्या घराशेजारील मोकळ्या जागेत पडलेली बांधकामाची वाळू उचलण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. यावेळी गावातीलच आरोपी समाधान गोवींदा पाटील, मनिषा समाधान पाटील आणि संगिता गोवींदा पाटील यांनी फिर्यादी कल्पना पाटील आणि त्यांच्या पतीला गाठले.

“तुमच्या घराशेजारी पडलेली बांधकामाची वाळू उचलून घ्या,” असे म्हणत आरोपींनी फिर्यादीशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. आरोपींनी कल्पना पाटील यांना अश्लील शिवीगाळ करत चापटबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, आरोपी समाधान पाटील याने फिर्यादीच्या डाव्या हातावर जोरात मारून दुखापत केली. इतक्यावरच न थांबता, “माझ्याकडील मशीनने तुमचे घर पाडून टाकेल,” अशी धमकीही यावेळी आरोपींनी दिली.

या घटनेनंतर घाबरलेल्या कल्पना पाटील यांनी भडगाव पोलीस स्टेशन गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ ज्ञानेश्वर पाटील करत आहेत.


Protected Content

Play sound