पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील नाथजी नगर परिसरात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वीज वितरणाच्या डीपी (डिस्ट्रिब्युशन बॉक्स) बसविण्याच्या कामामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. वारंवार तक्रारी आणि निवेदन देऊनही महावितरणकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आता नगरसेवक विवेक पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पारोळा शहरातील नाथजी नगर परिसरात गार्डनजवळ डीपी बसविण्यासाठी इलेक्ट्रिक खांब उभारण्यात आले होते. महावितरणने पूर्वी येथे डीपी बसवली होती, मात्र नंतर ती काढून नवीन डीपी बसविण्याचे आश्वासन नागरिकांना देण्यात आले होते. परंतु दोन ते तीन वर्षांचा कालावधी उलटूनही अद्याप नवीन डीपी बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे परिसरातील वीज पुरवठ्याच्या समस्या कायम असून नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या संदर्भात परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा तोंडी तक्रारी केल्या तसेच लेखी निवेदनही दिले, मात्र महावितरण प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. अखेर ही समस्या प्रभागाचे नगरसेवक विवेक पाटील यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. यानंतर नगरसेवक विवेक पाटील यांनी परिसरातील युवकांसह महावितरण कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले.
या निवेदनात त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, येत्या आठ ते दहा दिवसांत संबंधित ठिकाणी नवीन डीपी बसविण्याचे काम पूर्ण झाले नाही, तर नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करणे योग्य नसून, महावितरणने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी वेदांत शिंदे, भूषण निकम, हार्दिक पाटील, राहुल सर, आबा रोकडे, निखिल पवार, अजय सर, जयेश महाजन, कुणाल पवार, आबा सैंदाणे आणि रवी नाईक यांच्यासह परिसरातील अनेक युवक उपस्थित होते. नागरिकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून लवकरात लवकर समस्या सोडवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.



