Home क्राईम ‘रामू, माझी स्टोरी इन्स्टावर टाक’ असे लिहून तरूणाचं टोकाचं पाऊल !

‘रामू, माझी स्टोरी इन्स्टावर टाक’ असे लिहून तरूणाचं टोकाचं पाऊल !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील देवकर कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या एका १९ वर्षीय विद्यार्थ्याने नैराश्यातून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. रविवारी १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी नेहरू नगर येथील भाड्याच्या खोलीत ही धक्कादायक घटना घडली. श्याम प्रभाकर पाटील (रा. बोदवड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, त्याच्या खिशात आढळलेल्या सुसाईड नोटमुळे महाविद्यालयाचे प्राचार्य वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

मिळालेली माहिती अशी की, बोदवड येथील शेतकरी कुटुंबातील श्याम पाटील जळगावात राहून शिक्षण घेत होता. रविवारी १५ फेब्रुवारी रोजी त्याचे रुममेट मित्र गावाला गेले असल्याने तो खोलीवर एकटाच होता. संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्याने आपल्या मृत्यूला महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश पवार यांना जबाबदार धरले आहे.

सुसाईड नोटमधील हृदयद्रावक व्यथा :
श्यामने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, “माझी कोणतीही चुकी नसताना प्राचार्यांनी मला सर्व शिक्षक स्टाफ आणि मित्रांसमोर अपमानित करून मारहाण केली. मित्रांच्या भांडणात मध्यस्थी करायला गेलो असताना, समोरचा मुलगा मुले घेऊन आला तरी प्राचार्यांनी त्याला काहीच म्हटले नाही. उलट मलाच पीव्हीसी पाईपने मारले आणि शिवीगाळ केली. गुरु मारतात हे माहीत आहे, पण इतके नाही मारत.” पत्राच्या शेवटी त्याने आपल्या मित्राला उद्देशून, “रामू, मी गेल्यानंतर माझी स्टोरी इन्स्टावर टाक,” असे भावपूर्ण आवाहनही केले आहे.

पालकांचा आक्रमक पवित्रा :
या घटनेची माहिती मिळताच जळगाव शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. “जोपर्यंत प्राचार्य योगेश पवार आणि संबंधित दोषींवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,” अशी ठाम भूमिका श्यामच्या पालकांनी घेतली आहे. महाविद्यालयातील छळामुळे एका हुशार विद्यार्थ्याला जीव गमवावा लागल्याने विद्यार्थी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पोलीस तपास सुरू :
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सुसाईड नोट जप्त केली आहे. सध्या रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ अजित पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound