जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेत सोमवारी, १६ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या विशेष महासभेत महिला व बालकल्याण समितीच्या सदस्य निवडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सकाळी ११ वाजता महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत स्थायी समितीच्या निवडीनंतर लागलीच महिला व बालकल्याण समितीच्या ९ सदस्यांची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.
राजकीय बलाबल आणि पक्षनिहाय संधी :
महापौर दीपमाला काळे यांनी परंपरेप्रमाणे बंद पाकीटातून या समितीच्या सदस्यांची नावे वाचून दाखवली. यामध्ये भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व कायम राखले असून, समितीच्या एकूण ९ जागांपैकी ५ जागांवर भाजपच्या नगरसेविकांची वर्णी लागली आहे. शिवसेना शिंदे गटाला ३ जागा मिळाल्या आहेत, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला एका जागेवर संधी देण्यात आली आहे.

निवड झालेल्या सदस्यांची नावे:
भारतीय जनता पक्ष (५ सदस्य): रंजना वानखेडे, सुरेखा तायडे, पूजा जगताप, विद्या सोनवणे आणि गायत्री राणे.
शिवसेना शिंदे गट (३ सदस्य): सिंधुताई कोल्हे, प्रतिभा देशमुख आणि डॉ. अमृता सोनवणे.
शिवसेना उबाठा गट (१ सदस्य): हिनाबी शाकीर खान.
महिलांच्या प्रश्नांना मिळणार गती
गेल्या अनेक दिवसांपासून या समित्यांच्या निवडीची प्रतीक्षा होती. आज या निवडी जाहीर झाल्यामुळे महापालिका क्षेत्रातील महिलांचे प्रश्न, अंगणवाड्यांचे सक्षमीकरण आणि बालकांच्या कल्याणासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांना आता प्रशासकीय गती मिळणार आहे. या विशेष सभेला महापालिकेचे सर्व नगरसेवक आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समितीत निवड झालेल्या सर्व महिला सदस्यांचे महापौरांनी त्यांचे अभिनंदन केले. आता लवकरच या समितीच्या सभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. या विशेष सभेला आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, नगरसचिव सतिश शुक्ला, उपायुक्त निर्मला गायकवाड, आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.



