जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील खंडेराव नगर परिसरातील रेल्वे पुलाजवळ रविवारी, १५ फेब्रुवारी रोजी सकाळी एका ४४ वर्षीय प्रौढाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अमर वसंत सपकाळे (रा. खंडेराव नगर) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
अमर सपकाळे हे व्यवसायाने इस्त्री कामगार होते. ते गेल्या दोन दिवसांपासून कामासाठी बाहेरगावी गेले असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. मात्र, रविवारी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास खंडेराव नगर येथील रेल्वे पुलाच्या परिसरात त्यांचा मृतदेह काही नागरिकांना दिसून आला. घटनेची माहिती मिळताच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

अमर सपकाळे हे बाहेरगावी गेलेले असताना त्यांचा मृतदेह अशा स्थितीत आढळल्याने त्यांच्या नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा आरोप केला आहे. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेल्यानंतर नातेवाईकांनी तिथे एकच आक्रोश केला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कर्त्या व्यक्तीच्या अशा जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



