जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील फैजपूर, सावदा, चिनावल, यावल, रावेर परिसरातील सुमारे दोनश बांधकाम मजूरांनी आज दूपारी 1 वाजेच्या सुमारास विविध मागण्यांसाठी कामगार आयुक्त कार्यालयावर घेराव व ठिय्या आंदोलन केले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन दिले.
बांधकाम मजूरांच्या या आहे मागण्या
गरीब मजूर गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून जळगाव कार्यालयात नाव नोंदणीसाठी चकरा मारत असून नोंदणी अधिकारी दर वेळेस उडवाउडवीची उत्तरे देउन टाळाटाळ करीत आहेत, तसेच दरवेळी तुमच्या साईटवर येउन दोन-तीन दिवसात शहानिशा करुन नोंदणी करतो, असे सांगितले जाते. इमारत व बांधकाम कामगार नोंदणीची शेवटची मुदत १५ ऑगस्ट असून आता पावसाळा सुरुवात होत असल्याने व वाळू बंद असल्याने जवळपास सर्वच बांधकामे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मग नोंदणी अधिकारी नेमक्या कोणत्या साईटवर मजूरांची नोंदणी करणार? असा सवाल यावेळी कामगारांनी उपस्थित केला.
यावेळी यांची होती उपस्थिती
खान्देश नारीशक्ती संघटनेच्या अध्यक्षा दिपाली चौधरी, राष्ट्रीय नमो सेना जिल्हाध्यक्ष संदिप पाटील यांच्या नेतृत्वात तसेच नाथ फाऊंडेशनचे सदस्य सुनिल माळी, डॉ.अभिषेक ठाकुर यांच्या पाठींब्याने धडक देत आमच्या मजूरांची नोंदणी का करत नाहित? असा जाब विचारत कार्यालयाला घेराव घातला.
नोंदणी न झाल्यास आंदोलनाचा इशारा
यावेळी दिपाली चौधरी यांनी सांगितले की, यावल रावेर फैजपूर सावदा परीसरातील बांधकाम मजूर कामगार नोंदणीपासून वंचित असून येत्या सोमवारपर्यंत जर नोंदणी झाली नाही, सर्व मजूरांच्या परिवाराला सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहोत. परिणामांना सर्वस्वी कामगार आयुक्त व संबंधित नोंदणी अधिकारी जबाबदार असतील तसेच कामगार आयुक्त कार्यालयात कोणीही जबाबदार अधिकारी उपस्थित राहत नसल्याने कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला.
मजूरांची गर्दी
आंदोलनांमध्ये फैजपूर येथील कामगार, एम.मुसा जनविकास सोसायटी अध्यक्ष शाकिर ठेकेदार, जाग्रुती भोळे, देवेंद्र झोपे, उपाध्यक्ष- शेख इरफान कबीर, शेख हमीद, कासम अली, बाबू मोमीन, सदांम तडवी, अकबर तडवी, खलील शेख, चिनावल येथिल शेख जबिर अमान, छगन जोगी, अस्लम शेख अस्लम मोमीनसहित व सावदा, फैजपूर, चिनावल, यावल, रावेर परीसरातील शेकडो मजूर उपस्थित होते.