मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाशिवरात्रीनिमित्त मुक्ताईनगर शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविकांची गर्दी उसळली असून विविध सामाजिक उपक्रमांद्वारे भाविकांची सेवा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील डॉक्टर हेडगेवार व्यापारी संकुलाच्या वतीने फराळ वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.
महाशिवरात्री तसेच संत मुक्ताई व संत चांगदेव महाराज यात्रेनिमित्त मुक्ताईनगर आणि चांगदेव येथे दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असतात. यंदाही पहाटेपासूनच मंदिर परिसरात आणि शहरात भक्तांची वर्दळ वाढलेली दिसून आली. भाविकांच्या सोयीसाठी विविध सामाजिक संस्था व स्थानिक मंडळींनी पुढाकार घेतला आहे.

शहरातील डॉक्टर हेडगेवार व्यापारी संकुल, बोदवड रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडिया समोरील परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. संकुलातील सर्व व्यावसायिकांनी एकत्र येत नियोजनबद्ध पद्धतीने हा उपक्रम राबविला. हजारो भाविकांनी फराळाचा लाभ घेत समाधान व्यक्त केले.
फराळासोबतच पिण्याच्या पाण्याची तसेच इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था देखील करण्यात आली होती. दूरवरून आलेल्या भाविकांना अल्पोपहार मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला. सेवाभावातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे भाविकांकडून कौतुक करण्यात आले.
याशिवाय स्थानिक मित्रमंडळींनीही अन्नदान व सेवाकार्यात सहभाग घेत सामाजिक बांधिलकी जपली. महाशिवरात्रीनिमित्त शहरात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून सामाजिक एकोपा, सेवाभाव आणि सहकार्याची भावना अधोरेखित झाली आहे.



