Home Cities अमळनेर हिंगोणे खु.प्र.ज. ग्रामपंचायत १०० टक्के थकबाकीमुक्त ; सरपंच राजश्री पाटील यांचा आदर्श...

हिंगोणे खु.प्र.ज. ग्रामपंचायत १०० टक्के थकबाकीमुक्त ; सरपंच राजश्री पाटील यांचा आदर्श उपक्रम चर्चेत


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील हिंगोणे खु.प्र.ज. ग्रामपंचायतीने थकबाकीमुक्त होण्याचा मान मिळवला असून लोकनियुक्त सरपंच राजश्री राजेश पाटील यांच्या संकल्पनेतून हा आदर्श उपक्रम यशस्वी ठरला आहे. सरपंचांनी स्वखर्चातून संपूर्ण गावाची घरपट्टी व पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतीला आर्थिक दिलासा दिला असून त्यातूनच थकीत वीज बिलाची रक्कमही अदा करण्यात आली आहे.

हिंगोणे खु.प्र.ज. ग्रामपंचायतीवर मागील काही काळापासून वीज बिलाची मोठी थकबाकी होती. ग्रामविकासाच्या कामांसोबत आर्थिक शिस्त आवश्यक असल्याची जाणीव ठेवून सरपंच राजश्री पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत सुमारे ९ लाख रुपये घरपट्टी व पाणीपट्टी स्वखर्चातून भरली. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या तिजोरीत कराच्या स्वरूपात निधी उपलब्ध झाला आणि ग्रामस्थांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक बोजा पडला नाही.

याच कररकमेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीकडील सुमारे ७ लाख ८० हजार रुपयांचे थकीत वीज बिल अदा करण्यात आले. लाईट बिलाच्या थकबाकीचा धनादेश नुकताच विद्युत विभागाकडे सुपूर्द करण्यात आला. हा निर्णय माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायतीकडून देण्यात आली. धनादेश सुपूर्द करताना आमदार अनिल पाटील स्वतः उपस्थित होते. त्यांनी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे कौतुक करून इतर गावांसाठीही हा आदर्श असल्याचे नमूद केले.

सरपंच राजश्री पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गावात विविध विकासकामांना गती दिली. गाव दरवाजा उभारणी, नवीन स्मशानभूमीचे बांधकाम, ग्रामपंचायत कार्यालयाची उभारणी, पाणीपुरवठा योजना, संपूर्ण गावात रस्ता काँक्रीटीकरण, आधुनिक व डिजिटल अंगणवाडी, शनिदेव मंदिराचे बांधकाम तसेच महादेव मंदिराचा जीर्णोद्धार अशी अनेक कामे पूर्ण करण्यात आली. या विकासकामांमुळे गावाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

वीज बिलाचा धनादेश सुपूर्द करताना महावितरणच्या अमळगाव कक्षाचे सहाय्यक अभियंता उज्वल पाटील, ग्रामसेवक पवनकुमार वाघ तसेच वायरमन प्रमोद सैंदाने उपस्थित होते. ग्रामपंचायत १०० टक्के थकबाकीमुक्त झाल्याने गावात समाधानाचे वातावरण असून सरपंचांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.


Protected Content

Play sound