मुंबई-वृत्तसेवा । महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना देत परिवहन विभागाने हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) नसलेल्या वाहनांविरोधात 18 फेब्रुवारीपासून राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही अनेक वाहनधारकांनी अद्याप HSRP नंबरप्लेट बसविली नसल्याने आता कोणतीही सवलत न देता थेट कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
परिवहन आयुक्तांनी जाहीर केल्यानुसार, HSRP बसविण्यासाठी 15 फेब्रुवारी 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतरही मोठ्या प्रमाणात वाहने जुन्याच नंबरप्लेटवर सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे 18 फेब्रुवारीपासून वाहतूक पोलिस आणि परिवहन विभागाचे अधिकारी रस्त्यावर उतरून तपासणी करणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

परिवहन विभागाच्या नियमानुसार, 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना HSRP नंबरप्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, अनेक वाहनधारकांकडून फिटमेंट सेंटरची अपुरी संख्या, ऑनलाइन बुकिंग करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि वेळेअभावी नंबरप्लेट बसविण्यात विलंब झाल्याची कारणे दिली जात आहेत. तरीदेखील प्रशासनाने यापुढे कोणतीही मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेतला आहे.
वाहन तपासणीदरम्यान वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC), वैध विमा, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) आणि ड्रायव्हिंग लायसन्स (DL) ही कागदपत्रे देखील तपासली जाणार आहेत. यापैकी कोणतेही कागदपत्र अवैध किंवा अनुपस्थित आढळल्यास संबंधित वाहनचालकांवर दंड आणि अन्य कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील प्रमुख शहरांमध्येही HSRP मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसल्याचे चित्र आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे पात्र असलेल्या 24 लाखांहून अधिक वाहनांपैकी केवळ 35 टक्के वाहनांनीच आतापर्यंत नोंदणी केली आहे. याचा अर्थ सुमारे 65 टक्के वाहने अद्याप HSRP शिवाय सुरू आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता, एक कोटींपेक्षा अधिक वाहने अजूनही जुन्या नंबरप्लेटवर धावत असल्याची माहिती समोर आली आहे.
HSRP नंबरप्लेट बसविण्यासाठी परिवहन विभागाने अधिकृत खासगी एजन्सींची नियुक्ती केली आहे. वाहनधारकांना ऑनलाइन अर्ज करून फिटमेंटसाठी वेळ निश्चित करावी लागते. त्यानंतर संबंधित वाहन फिटमेंट सेंटरवर नेऊन नंबरप्लेट बसवली जाते. दुचाकीसाठी सुमारे 450 रुपये, तर चारचाकीसाठी सुमारे 745 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.



