Home राजकीय अन्यथा मी राजीनामा देईन : नरहरी झिरवाळ

अन्यथा मी राजीनामा देईन : नरहरी झिरवाळ


मुंबई-वृत्तसेवा | राज्याच्या मंत्रिमंडळाच्या इमारतीत गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धडक कारवाई केल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनातील लिपिकाला ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईनंतर संबंधित मंत्र्यांचे कार्यालय सील करण्यात आले असून तपासाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परवाना नूतनीकरणाच्या कामासाठी मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंग याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी ३५ हजार रुपये गुरुवारी देण्याचे ठरले होते. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. त्यानुसार मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर सापळा रचण्यात आला. पैसे स्वीकारताना राजेंद्र ढेरंग यांना रंगेहात पकडून अटक करण्यात आली.

कारवाईनंतर एसीबीने संबंधित मंत्र्यांचे कार्यालय सील केले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचतात, याचा तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीत अटक करण्यात आलेल्या लिपिकाने काही धक्कादायक नावे घेतल्याची चर्चा असून मंत्र्यांचे खासगी सचिवही संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “संबंधित कर्मचारी हा सरकारी कर्मचारी असून त्याच्या वैयक्तिक कृत्याशी माझा किंवा माझ्या सचिवांचा कोणताही संबंध नाही. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. जर या लाचखोरीच्या प्रकरणात माझ्यापर्यंत किंवा माझ्या कार्यालयातील इतर कोणापर्यंत धागेदोरे पोहोचले, तर मी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा देईन,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

मंत्रालयात एसीबीने कारवाई करण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे. यापूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात राजेंद्र दर्डा यांच्या कार्यालयावर अशीच कारवाई झाली होती. तसेच भाजप नेते एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांच्या स्वीय सहाय्यकावर लाचखोरीप्रकरणी कारवाई करण्यात आली होती.

आता नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयावर झालेल्या या धडक कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुढील काही दिवसांत तपासातून आणखी काय उघड होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound