ढाका-वृत्तसेवा | बांगलादेशमध्ये गुरुवारी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजेच बीएनपीने दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत संपादन केले आहे. 299 पैकी 286 जागांचे निकाल जाहीर झाले असून त्यापैकी 209 जागांवर विजय मिळवत बीएनपीने बहुमतासाठी आवश्यक 150 चा आकडा सहज पार केला आहे. सुमारे 20 वर्षांनंतर देशात सत्तांतर झाले असून बीएनपीचे सरकार स्थापन होणार आहे.
2008 ते 2024 या कालावधीत अवामी लीगची सत्ता होती आणि माजी पंतप्रधान Sheikh Hasina यांनी देशाचे नेतृत्व केले होते. या निवडणुकीनंतर मात्र राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.

जमात ए इस्लामी बांग्लादेशच्या नेतृत्वाखालील 11 पक्षांच्या आघाडीला 70 जागा मिळाल्या आहेत. जमात प्रमुख शफीकूर रहमान यांनी ढाका-15 मतदारसंघातून विजय मिळवला. मात्र अपेक्षित कामगिरी करण्यात आघाडी अपयशी ठरल्याचे चित्र आहे. तसेच, विद्यार्थी चळवळीमधून पुढे आलेल्या नॅशनल सिटीझन्स पार्टी लाही मतदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही.
बीएनपी अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान खालेदा जिया यांचे पुत्र तारिक रहमान यांनी दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती आणि दोन्ही ठिकाणी विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांचे पंतप्रधानपद जवळपास निश्चित मानले जात आहे. ते गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 17 वर्षांच्या वनवासानंतर बांगलादेशात परतले होते.
तारिक रहमान पंतप्रधान झाल्यास 35 वर्षांनंतर बांगलादेशला पुरुष पंतप्रधान मिळणार आहेत. 1988 मध्ये काझी जफर अहमद पंतप्रधान झाले होते. त्यानंतर 1991 ते 2024 या काळात देशाच्या राजकारणावर शेख हसीना आणि खालिदा झिया यांचेच वर्चस्व राहिले.
या निवडणुकीत अवामी लीग आणि पारंपरिक हिंदू मतदारांपैकी मोठा वर्ग बीएनपीकडे वळल्याचे विश्लेषण समोर येत आहे. दुसरीकडे, कट्टरपंथी जमात-ए-इस्लामीला अपेक्षित यश मिळू शकले नाही.
या निकालामुळे बांगलादेशच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाली असून आगामी काळात देशांतर्गत आणि परराष्ट्र धोरणात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



