जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना जळगाव विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी वेतनातील फरकाचा थकीत हप्ता न मिळाल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करत विभागीय कार्यालयासमोर आंदोलन छेडले. परिवहन मंत्र्यांकडून ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत हप्ता अदा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र निर्धारित मुदतीत रक्कम न मिळाल्याने संघटनेने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना जळगाव विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांना वेतनातील फरकाचा हप्ता अद्याप प्राप्त न झाल्याची माहिती देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर राज्य नेतृत्वातील संदीप शिंदे आणि सरचिटणीस हनुमंतराव ताटे यांनी परिवहन मंत्र्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून प्रलंबित हप्त्याबाबत चर्चा केली. त्यावेळी मंत्र्यांनी ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत थकीत रक्कम अदा करण्याचे मान्य केल्याचे संघटनेने स्पष्ट केले होते. तसेच, निर्धारित तारखेपर्यंत हप्ता न मिळाल्यास विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाला पूर्वीच देण्यात आला होता.

निर्धारित मुदत उलटूनही कर्मचाऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा न झाल्याने १२ फेब्रुवारी २०२६ रोजी जळगाव येथील रा.प. विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीदरम्यान दीड वाजता मुख्य बस स्थानक परिसरात हे आंदोलन पार पडले. यामध्ये आगार अध्यक्ष व सचिव, युनिट अध्यक्ष व सचिव, सर्व डेलीगेट, विभागीय कार्यकारिणी पदाधिकारी, कार्यसमिती सदस्य, कामगार कल्याण समिती सदस्य तसेच महिला प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
आंदोलनादरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर टीका करत कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणींचा मुद्दा उपस्थित केला. वेतनातील फरकाचा हप्ता वेळेत न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना कर्ज व इतर दैनंदिन खर्च भागवताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने दिलेले आश्वासन तातडीने पूर्ण करावे, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
दरम्यान, संघटनेच्या या आंदोलनामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये एकजूट दिसून आली असून, पुढील निर्णयासाठी राज्य नेतृत्वाशी समन्वय साधला जाणार असल्याची माहिती देण्यात आली. प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर थकीत रक्कम अदा करावी, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.



