जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन येथे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मृतीदिनानिमित्त एकात्म मानववाद : अंत्योदयाच्या दिशेने या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम दिनांक ११ फेब्रुवारी २०१६ रोजी दुपारी १२.४५ वाजता डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सेमिनार हॉलमध्ये पार पडला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. उमेश सोनवणे यांची उपस्थिती लाभली. आपल्या प्रभावी व विचारप्रवर्तक भाषणातून त्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनकार्याचा, राष्ट्रनिष्ठ विचारांचा तसेच समाजाभिमुख तत्त्वज्ञानाचा सविस्तर आढावा घेतला. एकात्म मानववादाच्या तत्त्वज्ञानाची सखोल मांडणी करत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळे पोहोचवण्याचा अंत्योदय हा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला.

सामाजिक समता, राष्ट्रसेवा, नैतिक मूल्ये आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रा. सोनवणे यांनी केले. यावेळी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी चित्रफीत दाखवण्यात आली. या चित्रफितीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारसरणीची जवळून ओळख होऊन राष्ट्रप्रेम व सामाजिक बांधिलकीची प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापकवर्ग तसेच सर्व शाखांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले असून विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
याच कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत चेतस पाटील (प्रथम वर्ष, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग) यांनी प्रथम क्रमांक तर मिस कांचन सोनावणे (प्रथम वर्ष, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग) यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
या स्मृती व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय विचारांची जाणीव निर्माण होऊन समाजाभिमुख दृष्टिकोन विकसित होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.



