अहमदाबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सामन्याचा निकाल दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये लागल्याची अभूतपूर्व घटना अहमदाबादमध्ये पाहायला मिळाली. दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात रंगलेल्या या थरारक लढतीत शेवटी दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये 4 धावांनी विजय मिळवत इतिहासाच्या पानावर आपले नाव कोरले.
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 187 धावांचा भक्कम डोंगर उभारला. रेयान रिकल्टनने 61 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली, तर क्विंटन डी कॉकने 59 धावा करत संघाला मजबूत सुरुवात करून दिली. डेवाल्ड ब्रेविसने 23 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात अफगाणिस्ताननेही जिद्दीने खेळ करत 187 धावांपर्यंत मजल मारली. रहमानुल्लाह गुरबाजने 84 धावांची तुफानी खेळी केली, तर अझमतुल्लाह ओमरझाईने 22 आणि राशिद खानने 20 धावा जोडल्या. सामना बरोबरीत सुटल्याने निकालासाठी सुपर ओव्हरचा थरार रंगला.

पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत 4, 6, 1, 1, 4, 1 अशा फटक्यांच्या जोरावर 17 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघालाही 17 धावाच करता आल्या. या षटकात डेवाल्ड ब्रेविस बाद झाला होता, मात्र शेवटच्या चेंडूवर ट्रिस्टन स्टब्सने षटकार ठोकत सामना पुन्हा बरोबरीत आणला आणि दुसऱ्या सुपर ओव्हरची वेळ आली.
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेने आक्रमक सुरुवात करत 6, 1, 2, 6, 6, 2 अशा फटक्यांच्या जोरावर 23 धावांचा पल्ला गाठला. 24 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्या चेंडूवर धाव नाही, दुसऱ्या चेंडूवर मोहम्मद नबी बाद झाला. त्यानंतर गुरबाजने सलग तीन षटकार ठोकत सामन्यात रंगत आणली. मात्र निर्णायक क्षणी तो बाद झाला. अखेरीस अफगाणिस्तानला 19 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि दक्षिण आफ्रिकेने 4 धावांनी विजय मिळवला.
दुसऱ्या सुपर ओव्हरच्या पहिल्या दोन चेंडूंवर धाव न मिळाल्याने अफगाणिस्तान दबावात आला होता. गुरबाजच्या आक्रमक फटक्यांमुळे विजयाची आशा निर्माण झाली होती, पण त्याच्या बाद झाल्याने सामना फिरला. या ऐतिहासिक डबल सुपर ओव्हर सामन्याने प्रेक्षकांना अक्षरशः खुर्चीच्या टोकावर बसवले.



