Home Cities जळगाव जळगाव पोलिस भरती २०२६ : आजपासून मैदानी चाचणीला सुरुवात ; अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा...

जळगाव पोलिस भरती २०२६ : आजपासून मैदानी चाचणीला सुरुवात ; अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्हा पोलिस दलातील १७१ शिपाई पदांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेत आज ११ फेब्रुवारीपासून मैदानी चाचणीला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व तयारी पूर्ण झाली असून जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मंगळवारी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. यंदाच्या भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी उंची व छाती मोजणीसाठी अत्याधुनिक उपकरणांचा वापर करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात पोलिस शिपाई पदाच्या १७१ जागांसाठी ११ ते २२ फेब्रुवारी दरम्यान मैदानी चाचणी होणार आहे. पहाटे साडेचार वाजता उमेदवारांना हजर राहावे लागणार आहे. पहिल्या दिवशी ११ फेब्रुवारी रोजी ५०० पुरुष उमेदवारांना बोलावण्यात आले असून त्यानंतर दररोज सुमारे एक हजार उमेदवारांची चाचणी घेण्यात येणार आहे. २१ व २२ फेब्रुवारी रोजी महिला उमेदवारांची मैदानी चाचणी पार पडणार आहे. दरम्यान १५, १६ आणि १९ फेब्रुवारी रोजी चाचणीस सुटी राहणार आहे.

मैदानी चाचणीदरम्यान प्रत्येक घटकाची अचूक आणि डिजिटल नोंद ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. उंची व छाती मोजणीसाठी विशेष आधुनिक उपकरण आणण्यात आले असून त्याद्वारे मानवी हस्तक्षेप कमी करून अचूक मोजमाप नोंदवले जाईल. पोलिस भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

धावण्याच्या चाचणीसाठी विविध अंतरांचे स्वतंत्र ट्रॅक तयार करण्यात आले आहेत. उमेदवारांना मैदानात प्रवेश देण्यापूर्वी त्यांच्या बॅगची सखोल तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करूनच पुढील प्रक्रियेस परवानगी दिली जाईल. संपूर्ण प्रक्रियेवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बारकाईने लक्ष राहणार आहे.

भरतीदरम्यान कोणताही गैरप्रकार आढळल्यास संबंधित उमेदवारास तात्काळ प्रक्रियेतून बाहेर काढण्यात येणार आहे. तसेच एनर्जीक इंजेक्शन किंवा अन्य बेकायदेशीर साधनांचा वापर केल्याचे आढळल्यास डिबार करण्यासह गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

पहाटे ४:३० वाजता उपस्थित राहावे लागत असल्याने बाहेरगावाहून येणारे अनेक उमेदवार जळगाव शहरात दाखल झाले आहेत. त्यांच्या निवासाची तात्पुरती व्यवस्था शहर पोलिस ठाणे परिसरातील सभागृहात करण्यात आली आहे. उमेदवारांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले की, “पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उंची व छाती मोजणी केली जाईल. प्रक्रियेत पारदर्शकता राखली जाईल आणि कोणताही गैरप्रकार सहन केला जाणार नाही.” त्यामुळे यंदाची पोलिस भरती प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध आणि तंत्रज्ञानाधिष्ठित पद्धतीने पार पडणार आहे.


Protected Content

Play sound