Home राजकीय मुंबई महापालिकेत सत्तात्तरानंतर मोठा प्रशासकीय बदल

मुंबई महापालिकेत सत्तात्तरानंतर मोठा प्रशासकीय बदल


मुंबई-वृत्तसेवा | मुंबई महापालिका मुख्यालयातील राजकीय आणि प्रशासकीय रचनेत महत्त्वाचे बदल सुरू झाले आहेत. नव्या महापौरांचा कार्यकाळ सुरू होताच शिक्षण समितीच्या कार्यालयात सुरू असलेले उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे दालन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांचे दालनही बंद करण्यात आले होते.

गेल्या तीन वर्षांत महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकांच्या माध्यमातून कारभार चालत होता. त्या काळात नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी पालकमंत्र्यांची दालने सुरू करण्यात आली होती. मात्र, आता नगरसेवक निवडून आल्याने ही गरज संपल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे शिक्षण समितीचे कार्यालय पुन्हा मूळ कामकाजासाठी वापरण्याची तयारी सुरू आहे.

दरम्यान, महापालिकेतील पक्ष कार्यालयांबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेचे कार्यालय दोन भागांत विभागण्यात आले असून, एक भाग उद्धव ठाकरे गटाला तर दुसरा भाग एकनाथ शिंदे गटाला देण्यात आला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत पक्ष कार्यालयांचे वाटप नगरसेवकांच्या संख्येनुसार करण्यात आल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
निवडणूक निकालानंतर सर्व पक्षांना त्यांच्या प्रतिनिधित्वानुसार कार्यालये देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे मुख्यालयातील जागांचे नव्याने नियोजन करण्यात येत आहे.

या सर्व बदलांमुळे प्रशासकांच्या काळातील तात्पुरत्या व्यवस्था संपून, निवडून आलेल्या प्रतिनिधींमार्फत महापालिकेचा दैनंदिन कारभार अधिक सुसूत्र होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.


Protected Content

Play sound