विवरे, ता. रावेर प्रतिनिधी | मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेत दोन दर्जेदार काव्यसंग्रहांची भर पडली असून, विवरे गाव साहित्यिक चैतन्याने उजळून निघाले आहे. शिक्षण विकास मंडळ विवरे संचलित श्री. ग. गो. बेंडाळे हायस्कूलच्या उपशिक्षिका तथा कवयित्री श्रीमती सुनिता सुरवाडे (विजयसुता) यांच्या ‘मूक सावलीची साथ’ आणि ‘भावना एक सागर’ या दोन काव्यसंग्रहांचा भव्य प्रकाशन सोहळा ९ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील होते. रावेर शिक्षण संवर्धक संघाचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र आठवले यांच्या हस्ते या दोन्ही काव्यसंग्रहांचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे प्रसिद्ध कवी किरण प्रकाश, जळगावच्या सामाजिक कार्यकर्त्या प्रा. नीता पाटील, संध्या भोळे, ॲड. निखिल पाटील, ॲड. विजय चौधरी, ॲड. समीर वाल्हे, अभय शिंदे, माजी सरपंच वासुदेव नरवाडे आणि झारखंडचे पोलीस निरीक्षक सुभाष नरवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

संस्थेचे चेअरमन प्रा. शैलेश राणे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. याप्रसंगी कवयित्री सुनिता सुरवाडे यांनी आपल्या काव्यप्रवासाचा उलगडा करत लेखनामागील प्रेरणा आणि भावविश्व व्यक्त केले. प्रसिद्ध कवी किरण प्रकाश यांनी दोन्ही काव्यसंग्रहांची सखोल समीक्षा करून त्यातील आशयघनतेचे कौतुक केले. ॲड. निखिल पाटील यांनी कवयित्रींचा गौरव ‘एक सुसंस्कृत आणि नीतिमत्तेवर उभी असलेली ताकदीची स्त्री’ अशा शब्दांत केला.
कार्यक्रमात संध्या भोळे यांनी विद्यार्थ्यांना सातत्याने वाचन-लेखन करण्याचे आवाहन केले, तर डॉ. राजेंद्र आठवले यांनी शिक्षिका आणि कवयित्री अशा दोन्ही भूमिका समर्थपणे पेलणाऱ्या सुरवाडे यांच्या कार्याला ‘दुग्धशर्करा योग’ संबोधिले. अध्यक्षीय भाषणात डॉ. उल्हास पाटील यांनी काव्यसंग्रहातील ओळींचे विश्लेषण करत उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले.
या सोहळ्याला संस्थेचे सचिव केशव राणे, मुख्याध्यापक पी. एच. वायकोळे, पर्यवेक्षक रवींद्र कोल्हे यांच्यासह अनेक संचालक, शिक्षक, साहित्यिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन तेजल भिरुड यांनी केले, तर आभार पूनम राणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



