Home Cities जळगाव ग्रामसेवक प्रोसेडिंग बुक घेऊन फरार ; जिल्हा परिषदेत उपसरपंच व सदस्यांचा ठिय्या

ग्रामसेवक प्रोसेडिंग बुक घेऊन फरार ; जिल्हा परिषदेत उपसरपंच व सदस्यांचा ठिय्या


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कानळदा ग्रामपंचायतीत मासिक सभेदरम्यान घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून, ग्रामसेवकाने थेट प्रोसेडिंग बुक घेऊन सभेतून पलायन केल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंचांनी केला आहे. या घटनेमुळे ग्रामपंचायतीतील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

कानळदा ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ग्रामसेवक रघुनाथ चव्हाण यांनी कोणतीही पूर्वसूचना किंवा सभासदांची संमती न घेता प्रोसेडिंग बुक ताब्यात घेऊन सभास्थळावरून निघून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. सभेदरम्यान अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित सदस्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामपंचायतीत कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार सुरू असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा संशयही यानिमित्ताने व्यक्त केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामसेवकाने कोरे प्रोसेडिंग बुकवर ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंचांच्या सह्या घेऊन त्याचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात येत आहे. सभेअंती प्रोसेडिंग बुकसह ग्रामपंचायत कार्यालयातून ग्रामसेवक फरार झाल्याचे समजताच सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकारामुळे आपली फसवणूक झाल्याचा आरोप करत सदस्यांनी तात्काळ कारवाईची मागणी लावून धरली आहे.

या गंभीर प्रकरणाची दखल घेण्यासाठी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांसह महिला सदस्य व इतर सभासदांनी थेट जिल्हा परिषद गाठली. त्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात ठिय्या देत संबंधित ग्रामसेवकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी सदस्यांनी, प्रोसेडिंग बुक हे सभेसमोर सादर करूनच गावाच्या हिताचे निर्णय नोंदवले जावेत, अशी ठाम भूमिका मांडली.

संतप्त सदस्यांनी मासिक सभा अर्धवट सोडून प्रोसेडिंग बुक घेऊन जाणे हे अत्यंत संशयास्पद व नियमबाह्य असल्याचा आरोप केला. ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता राखणे अपेक्षित असताना अशा प्रकारामुळे गावच्या विकास प्रक्रियेलाच धक्का बसत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.


Protected Content

Play sound