यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील नगरपालिकेकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील गटारीमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्येवर अखेर तोडगा निघाला असून, नगराध्यक्षांनी तात्काळ दखल घेतल्याने संबंधित ठिकाणी नवीन लोखंडी जाळी बसवण्यात आली आहे. हनुमान मंदिरासमोरील या वर्दळीच्या रस्त्यावर झालेल्या कामामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावल शहरातील मेन रोडवरील हनुमान मंदिर समोरील गटारीवरील जुनी जाळी निकामी झाल्याने पादचाऱ्यांसह वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः रात्रीच्या वेळी व गर्दीच्या वेळात या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला होता. अनेक दिवसांपासून नागरिकांकडून तक्रारी होत असतानाही समस्या कायम होती.

दरम्यान, या प्रभागाचे नगरसेवक व शिक्षण समितीचे सभापती पराग सराफ यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ नगराध्यक्ष सौ. छायाताई पाटील व नगरसेवक अतुल पाटील यांच्याशी संपर्क साधला. गटारीवरील जाळी तातडीने बदलण्याची गरज असल्याची माहिती त्यांनी दिली व त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली.
नगराध्यक्ष सौ. छायाताई पाटील यांनी याबाबत कोणताही विलंब न करता संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना दिल्या. प्रशासनाच्या वतीने हनुमान मंदिरासमोरील धोकादायक गटारीवर नवीन व मजबूत लोखंडी संरक्षण जाळी बसवण्यात आली. या कामामुळे रस्त्यावरील वाहतूक अधिक सुरक्षित झाली असून पादचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
नगरपालिका प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, नगराध्यक्ष सौ. छायाताई पाटील तसेच नगरसेवक पराग सराफ आणि अतुल पाटील यांचे आभार मानले जात आहेत. छोट्या पण महत्त्वाच्या समस्येवर वेळीच उपाय झाल्याने शहरातील नागरी सुविधांकडे लक्ष दिले जात असल्याचा सकारात्मक संदेश नागरिकांमध्ये गेला आहे.



