Home क्राईम पाडळसा येथे बाजार समिती कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला ; तिघांविरुद्ध फैजपूर पोलिसांत गुन्हा...

पाडळसा येथे बाजार समिती कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला ; तिघांविरुद्ध फैजपूर पोलिसांत गुन्हा दाखल


फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील पाडळसा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यावर मारहाण झाल्याची गंभीर घटना समोर आली असून या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकृत कामासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यावरच हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून बाजार समितीतील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ही घटना ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ९.१५ ते ९.३० वाजण्याच्या दरम्यान पाडळसा (ता. यावल) येथे घडली. याप्रकरणी डिगंबर गजानन चौधरी, रा. गांधी चौक, सावदा, ता. रावेर यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ते कृषी उत्पन्न बाजार समिती, यावल येथे क्लर्क म्हणून कार्यरत असून व्यापाऱ्यांकडून मार्केट फी व सुपरव्हिजन फी वसुलीचे काम पाहतात.

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, डिगंबर चौधरी हे आपल्या कामाच्या अनुषंगाने पाडळसा येथील व्यापारी बाळु रुपचंद तेली यांच्या गोडाऊनवर टोकन देण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी ट्रान्सपोर्टच्या मालाबाबत चौकशी केली असता, बाळु रुपचंद तेली, त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर तेली तसेच सागर रविंद्र तायडे यांनी अचानक चौधरी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

वाद वाढताच तिघांनी मिळून चौधरी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी ज्ञानेश्वर तेली याने लाकडी काठीने त्यांच्या पायावर प्रहार केल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. तसेच पुन्हा येथे आल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही आरोपींकडून देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या हल्ल्यानंतर डिगंबर चौधरी यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने फैजपूर पोलीस ठाणे गाठले. मारहाणीमुळे त्यांच्या नाकासह शरीराच्या विविध भागांना दुखापत झाली असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय, न्हावी येथे वैद्यकीय उपचार करण्यात आले.

या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमान्वये बाळु रुपचंद तेली, ज्ञानेश्वर बाळु तेली आणि सागर रविंद्र तायडे (सर्व रा. पाडळसा, ता. यावल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विकास सोनवणे करीत आहेत.


Protected Content

Play sound