भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील साकेगाव शिवारात एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ५० ते ६० वर्ष वयोगटातील एका अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. हा अपघात आज पहाटेच्या सुमारास झाला असून, अपघात घडवल्यानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी ८ फेब्रुवारी रोजी पहाटे ४:३० वाजण्यापूर्वी ही घटना घडली. जळगावकडून भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील साकेगाव येथील एका चहाच्या दुकानासमोर एक अज्ञात व्यक्ती रस्ता ओलांडत असावी किंवा रस्त्याच्या कडेने जात असावी. याच दरम्यान, भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने या व्यक्तीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, सदर व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच साकेगाव येथील पोलीस पाटील गणेश शांताराम भोई (वय ३१) यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा अंधारे करत आहेत.



