पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. रात्रीच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी फिर्यादीच्या राहत्या घराचा लाकडी दरवाजा पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी किरण उमेश राऊळ (वय ३२, रा. नगरदेवळा, ता. पाचोरा) या आपल्या घरी असताना, ७ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती विना क्रमांकाच्या मोटारसायकलवर तिथे आले. या दोघांचे वय अंदाजे ३० ते ४० वर्षे असून त्यांनी आपले चेहरे रुमालाने बांधलेले होते. शरीराने मजबूत असलेल्या या इसमांनी घराच्या लाकडी दरवाजावर पेट्रोल ओतले आणि काडीपेटीच्या सहाय्याने आग लावून दिली. फिर्यादीचे घर पूर्णपणे जाळून टाकण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आल्याचे प्राथमिक तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांत गुन्हा दाखल या घटनेनंतर फिर्यादी किरण राऊळ यांनी पाचोरा पोलीस स्थानकात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे करत आहेत.



