Home धर्म-समाज मुक्ताबाई फिरता नारळी सप्ताहात तरुणाईसाठी ज्ञानेश्वरी चिंतनाचे आयोजन

मुक्ताबाई फिरता नारळी सप्ताहात तरुणाईसाठी ज्ञानेश्वरी चिंतनाचे आयोजन


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आदिशक्ती मुक्ताबाई फिरता नारळी सप्ताह महोत्सव यंदा विशेष आकर्षण ठरणार असून या महोत्सवात तरुणाईसाठी ज्ञानेश्वरी चिंतनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकल हिंदू समाज यावल व रावेर तालुक्यांनी यंदाचे यजमानपद स्वीकारले असून या उपक्रमातून नव्या पिढीला अध्यात्माशी जोडण्याचा संकल्प करण्यात आल्याची माहिती महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी दिली.

या महोत्सवाच्या नियोजनासाठी कुंभारखेडा येथे नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कार्यक्रमाची रूपरेषा, नियोजन तसेच विविध समित्यांची रचना याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीचे प्रास्ताविक डिंगंबर महाराज मठाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी केले आणि महोत्सव यशस्वी करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची माहिती दिली.

फिरता नारळी सप्ताह हा 17 मार्च ते 24 मार्च या कालावधीत सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या कुंभारखेडा गावात होणार आहे. या काळात दररोज सकाळी व रात्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण होणार असून महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने भाविकांसाठी आयोजित करण्यात आली आहेत. या आध्यात्मिक पर्वात सहभागी होण्यासाठी परिसरातील तसेच दूरवरून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे दररोज दुपारी 3 ते 5 या वेळेत तरुणाईसाठी ज्ञानेश्वरी चिंतनाचा विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे. गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर तसेच ॲड. जयवंत बोधले हे तरुणांना अध्यात्म, जीवनमूल्ये आणि सामाजिक जाणीव याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. या सत्रांमुळे तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

या महोत्सवाला महंत रामगिरी महाराज अधिपती, सद्गुरू गंगागिरी महाराज (सरला बेट) यांची विशेष उपस्थिती लाभणार असून त्यामुळे कार्यक्रमाचे आध्यात्मिक महत्त्व अधिक वाढणार आहे. या सोहळ्यामुळे यावल व रावेर तालुक्यातील भाविकांना एक सुवर्णसंधी मिळणार असून संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

बैठकीत हा महोत्सव भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरा करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला. सुमारे 150 कार्यकर्ते या आयोजनासाठी सक्रिय राहणार असून सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासनाचेही मोलाचे सहकार्य लाभणार असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी सर्वांनी उत्स्फूर्त सहकार्य करावे, असे आवाहन केले.

या नियोजन बैठकीस रवींद्र महाराज हरणे, भैय्यासाहेब रवींद्र पाटील (मुक्ताई संस्थान अध्यक्ष), नरेंद्र नारखेडे, उद्धव महाराज जुनारे, भरत महाराज, दुर्गादास महाराज नेहते, धनराज महाराज, ऋषिकेश महाराज, मुकेश पाटील, उमाकांत मावळे तसेच कुंभारखेडा ग्रामस्थ, सकल हिंदू समाज व यावल-रावेर तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound