मुंबई—लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । अटीतटीच्या आणि शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात नेपाळचं ऐतिहासिक विजयाचं स्वप्न अखेर भंगलं. इंग्लंडने अवघ्या चार धावांनी सामना जिंकत अनुभवाची छाप उमटवली. शेवटच्या षटकात नेपाळसमोर १० धावांचं आव्हान असताना सॅम करनने अचूक मारा करत इंग्लंडचा विजय निश्चित केला.
इंग्लंडने दिलेल्या १८४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला होता. लोकेश बाम आणि सॅम करन यांच्यातील अंतिम षटकातील संघर्ष प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा ठरला. अनुभवी करनने दबावाखाली चौकार-षटकार जाऊ न देता नेपाळच्या फलंदाजांना रोखले. लोकेश बामने २० चेंडूत ३९ धावांची झुंजार खेळी करत सामन्याला रंगत आणली, मात्र अखेर नेपाळला पराभव स्वीकारावा लागला.

नेपाळच्या डावाची सुरुवात मात्र अडखळती झाली. सलामीवीर आसिफ शेख झटपट बाद झाला. त्यानंतर कुशल भुर्तेल आणि कर्णधार रोहित पौडेल यांनी आक्रमक फलंदाजी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. भुर्तेलने १७ चेंडूत २९ धावा केल्या, तर रोहितने ३४ चेंडूत ३९ धावांची संयमी खेळी केली. पुढे देवेंद्र सिंग एरीने जबाबदारी स्वीकारत २९ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह ४४ धावांची दमदार खेळी केली.
धावगती वाढत असताना लोकेश बामने चौकार-षटकारांची आतषबाजी करत सामना नेपाळच्या बाजूने झुकवला. जोफ्रा आर्चरच्या एका षटकात नेपाळने तब्बल २२ धावा उचलून विजयाची आशा पल्लवित केली, मात्र शेवटच्या षटकात सॅम करनने अनुभवाच्या जोरावर नेपाळचा डाव रोखला.
याआधी प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने जेकब बेथेल आणि कर्णधार हॅरी ब्रूक यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर १८४ धावांची मजल मारली. अनुभवी जोस बटलर २६ धावा करून बाद झाला, तर फिल सॉल्ट आणि टॉम बॅन्टन स्वस्तात तंबूत परतले. त्यानंतर ब्रूक आणि बेथेल यांनी संयमी पण आक्रमक भागीदारी करत डाव सावरला. बेथेलने ३५ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५५ धावा केल्या.
बेथेल बाद झाल्यानंतर हॅरी ब्रूकने डावाची सूत्रं हाती घेतली. नेपाळने नियमित अंतराने विकेट्स घेतल्या, मात्र विल जॅक्सने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत इंग्लंडला भक्कम धावसंख्या उभी करून दिली. जॅक्सने १८ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ३९ धावा केल्या, तर ब्रूकने ३२ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५३ धावांची खेळी केली. नेपाळकडून दिपेंद्र सिंग एरी आणि नंदन यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
१८ चेंडूत ३९ धावांची निर्णायक खेळी करणाऱ्या विल जॅक्सला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. नेपाळने पराभव पत्करला असला तरी त्यांच्या लढतीने क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेतलं असून, भविष्यासाठी आशादायी संकेत दिले आहेत.



