जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील युवक-युवतींना स्वयंरोजगार व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही महत्त्वाकांक्षी योजना सन २०१९ पासून प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग मंडळ यांच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी होत असून, नवउद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जात आहे.
या योजनेअंतर्गत पात्र उत्पादन व सेवा उद्योगांसाठी अर्ज करता येणार आहे. उत्पादन उद्योगासाठी कमाल १ कोटी रुपये तर सेवा उद्योगासाठी ५० लाख रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांना मंजुरी दिली जाणार आहे. १८ वर्षे पूर्ण झालेले, कोणतेही स्थायी उत्पन्न नसलेले व यापूर्वी शासनाच्या कोणत्याही अनुदानाधारित स्वयंरोजगार योजनेचा लाभ न घेतलेले स्थानिक रहिवासी या योजनेसाठी पात्र आहेत. ठराविक मर्यादेपेक्षा अधिक प्रकल्प रकमेच्या उद्योगासाठी अर्जदार किमान आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

योजनेत उत्पादन, सेवा, कृषीपूरक व कृषीआधारित उद्योग, ई-वाहतूक, ब्रँडआधारित साखळी विक्री केंद्रे, फिरते खाद्यान्न केंद्र, कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन, मत्स्यपालन, रेशीम उद्योग, हॉटेल-ढाबा, होम-स्टे, क्लाऊड किचन आदी उद्योगांचा समावेश करण्यात आला आहे. अनुसूचित जाती-जमाती, महिला, इतर मागासवर्ग, दिव्यांग, माजी सैनिक, विमुक्त व भटक्या जमाती तसेच अल्पसंख्याक प्रवर्गातील अर्जदारांना शहरी भागासाठी २५ टक्के व ग्रामीण भागासाठी ३५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. इतर प्रवर्गातील अर्जदारांना शहरी भागासाठी १५ टक्के व ग्रामीण भागासाठी २५ टक्के अनुदान मिळणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक अर्जदारांनी http://maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र किंवा खादी ग्रामोद्योग मंडळ, सदगुरु एज्युकेशन सोसायटी इमारत, ख्वाजामिया चौक, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, या कार्यालयाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी कोणत्याही खाजगी व्यक्तीची नेमणूक करण्यात आलेली नाही. खाजगी व्यक्तीकडून फसवणूक झाल्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही, अशी सूचना देण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र युवक-युवतींनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांनी केले आहे.



